३00 रिक्षाचालकांची चौकशी
By Admin | Published: June 14, 2017 01:51 AM2017-06-14T01:51:44+5:302017-06-14T01:51:44+5:30
धावत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तब्बल ६ हजार आॅटोरिक्षांची
- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : धावत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तब्बल ६ हजार आॅटोरिक्षांची यादी तयार केली असून, त्यापैकी ३00 रिक्षाचालकांची चौकशी मंगळवारी दिवसभर करण्यात आली.
तीनहातनाका येथून मानपाडा येथे जाणाऱ्या आॅटो रिक्षात बसलेल्या एका तरुणीशी रिक्षाचालकाच्या वेशात असलेल्या एका सहप्रवाशाने ७ जून रोजी रात्री अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीस प्रतिकार केल्याने त्याने तरुणीला धावत्या रिक्षातून ढकलले होते. या आॅटोरिक्षाचा क्रमांक ३ पासून सुरू होत असल्याची माहिती तरुणीने दिल्यानंतर पोलिसांनी या क्रमांकापासून सुरू होणाऱ्या सर्व आॅटोरिक्षांची यादी तयार केली आहे. या यादीत जवळपास ६ हजार रिक्षा असून, त्या सर्वांची क्रमाक्रमाने चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यापैकी ३00 रिक्षाचालकांना मंगळवारी पोलीस मुख्यालयाच्या साकेत येथील मैदानावर बोलविण्यात आले होते. या रिक्षांची कागदपत्रे, चालकांचा वाहन चालविण्याचा परवाना; तसेच रिक्षाचा इंजिन आणि चॅसिस नंबरही पोलिसांनी पडताळून पाहिला. संपूर्ण दिवसभर ही प्रक्रिया सुरू होती. यासाठी पोलीस यंत्रणेने आॅटोरिक्षा चालक-मालक संघटनेचीही मदत घेतली आहे. रिक्षाचालकांसोबत मालकांचीही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटना रात्रीची असल्याने आणि सीसी कॅमेऱ्याचे फूटेज अस्पष्ट असल्याने आरोपीपर्यंत पोहोचताना पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत.