लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: संकटग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद्याला क्विंटलमागे ३०० रुपये अनुदान देण्याची घोषणा सोमवारी विधानसभेत केली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर नाराजी व्यक्त करीत विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे सांगितले की, खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे.
कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून, त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील व जिव्हाळ्याचा भाग आहे.
समितीची २०० रुपये शिफारस होती
उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली होती. समितीने दोनशे आणि तीनशे रुपये प्रतिक्विंटल शिफारस केली होती. परंतु हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे असून त्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रतिक्विंटल ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
क्विंटलमागे ५०० रुपये द्या : भुजबळ
कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना एकरी १२०० रुपये उत्पादन खर्च येतो. प्रत्यक्षात चारपाचशे रुपयेच हाती पडतात. निदान क्विंटलमागे ५०० रुपये तरी अनुदान द्या अशी मागणी ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ यांनी केली. त्यावर, ‘तुम्ही शेतकऱ्यांना गाजर दाखवले, आम्ही गाजर हलवा देतोय’ असे मुख्यमंत्री म्हणाले. संतप्त विरोधकांनी सभात्याग केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"