वर्सोवा-दहिसर 'कोस्टल'साठी ३०० झाडे तोडणार; चारकोपमध्ये लावल्या नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 09:54 IST2025-03-08T09:53:35+5:302025-03-08T09:54:28+5:30
स्थानिक रहिवाशांचा विरोध, पुनर्रोपणाचा महापालिका प्रशासनाचा निर्णय

वर्सोवा-दहिसर 'कोस्टल'साठी ३०० झाडे तोडणार; चारकोपमध्ये लावल्या नोटिसा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मरिन ड्राइव्ह ते वरळी-वांद्रे सी लिंकपर्यंतच्या मार्गानंतर महापालिकेने आता वर्सोवा ते दहिसर या कोस्टल रोडच्या पुढच्या टप्प्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. या विस्तारित पुलाच्या बांधकामात अडथळा ठरत असलेल्या ३०० हून अधिक झाडांची छाटणी आणि पुनर्रोपण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव पूल विभागाच्या अभियंत्यांनी वृक्ष प्राधिकरणाला दिला आहे.
या पार्श्वभूमीवर कांदिवलीतील चारकोप येथे शुक्रवारी नोटीस लावण्यात आल्या. मात्र, तेथील स्थानिक रहिवाशांनी याला प्रचंड विरोध करत आमच्या विभागातील हरित क्षेत्र संपुष्टात येईल, अशी भीती व्यक्त केली आहे.
वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्गासाठी (कोस्टल रोड) आवश्यक असलेली सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्राची केंद्राची व राज्याची तसेच पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे. या कोस्टल रोडचे काम एकूण सहा पॅकेजमध्ये चालणार असून, या प्रकल्पासाठी चार मोठ्या कंत्राटदारांची निवडही पालिकेकडून करण्यात आली आहे.
वर्षभरापूर्वी या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. मात्र, मंजुरीअभावी हा प्रकल्प रखडला होता. आता त्याला गती दिली जात आहे. याचाच एक भाग म्हणून वर्सोवा-दहिसर कोस्टल मार्गातील पॅकेज 'ई' म्हणजे चारकोप ते गोराई टप्प्याच्या विकासाला पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे.
हरित क्षेत्र वाचविण्यावर भर : आ. संजय उपाध्याय
बोरीवलीचे स्थानिक आ. संजय उपाध्याय यांना याबाबत माहिती देण्यात आली असून, त्यांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत आपण लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगितले. आवश्यक त्या विकासासाठी काही वृक्षांची छाटणी अपरिहार्य असली, तरी हरित क्षेत्र वाचवण्यावर आपला भर असेल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय पुनर्रोपणाची झाडे किती व कुठे लावण्यात येतील, याचीही माहिती ते घेणार आहेत. १३६ हेक्टरचे खारफुटी क्षेत्र चारकोप परिसरात असून, तेही बाधित होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
वड, पिंपळ, फुलझाडांची २००६ पासून लागवड
चारकोप येथील वृक्षतोडीची नोटीस पाहताच येथील स्थानिकांनी त्याला विरोध केला आहे. या परिसरात २००६ पासून स्थानिकांनी पुढाकार घेऊन वृक्ष लागवड केली आहे. वड, पिंपळ आणि अनेक फुलझाडांचा यात समावेश आहे, अशी माहिती स्थानिक पर्यावरण चारकोप परिसरात काही दिवसांपासून येथे माती चाचणी आणि इतर अनेक प्रक्रिया सुरू आहेत. पण त्याची माहिती कोणीही देत नाही. यासंदर्भात त्यांनी तेथील स्थानिक आ. संजय उपाध्याय यांच्याशीही संपर्क साधला.