मुंबईत ३,००० कंत्राटी पोलिस; मनुष्यबळाची टंचाई असल्याने निर्णय; ३० कोटींची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 06:36 AM2023-10-12T06:36:52+5:302023-10-12T06:37:35+5:30
या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी ३० कोटी रुपये खर्चासही सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून, नवीन भरती होईपर्यंत पोलिस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी ३० कोटी रुपये खर्चासही सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.
आगामी नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी, अशा सणासुदीच्या काळात बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. त्या पार्श्वभूमीवर ही पोलिस भरती राज्य सुरक्षा महामंडळांच्या जवानांतून करण्यात येणार आहे. ११ महिने किंवा भरती होण्यापर्यंतचा कालावधी यातील जो कमी कलावधी असेल तेवढ्या काळापुरती ही भरती राहणार आहे. त्यानंतर पुन्हा हे जवान सुरक्षा महामंडळाच्या सेवेत रुजू होणार आहेत. यासाठी १०० कोटी २१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, तीन महिन्यांच्या पगारासाठी ३० कोटी रुपये दिले जाणार आहेत.
कंत्राटी पोलिस भरतीमुळे राज्यातील सुरक्षाव्यवस्था ऐरणीवर येईल, अशी टीका करीत पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारला घेरले होते. यावर उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले होते.
कंत्राटी पोलिस भरतीवरून पावसाळी अधिवेशनात वाद
- पोलिस दलात कंत्राटीतत्त्वावर कोणतीही भरती केली जाणार नाही. सध्या केवळ पोलिस दलातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जवान वापरले जाणार आहेत.
- ही पोलिस दलातील कंत्राटी भरती नाही. आपण वेगवेगळ्या आस्थापनांना आपल्या महामंडळातर्फे जवान देतो, तसेच याठिकाणी देत आहोत.
- राज्य सरकार पोलिस भरतीमध्ये कंत्राटी पद्धतीचा वापर करण्याचा कुठलाही विचार करत नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.