मुंबई- गेल्या काही दिवसापूर्वी राज्य सरकारने राज्यात कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. आता यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईत कंत्राटी पद्धतीने ३ हजार पोलिसांची भरती करण्यास हिरवा कंदील दिला आहे.
आता मुंबईत कंत्राटी पद्धतीने ३ हजार पदे भरण्यात येणार आहेत. ही पद ११ महिन्यांसाठी असणार आहेत. मुंबईत भरती करण्यास गृह विभागाने मंजूरी दिली आहे. यासाठी ३० कोटी रुपये राखीव ठेवण्यात येणार आहेत. राज्य सुरक्षा महामंडळातर्फे कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा'वर धडकणारा मराठा मोर्चा वाटेतच अडवला; आंदोलक ताब्यात
मुंबई पोलिसांकडे मनुष्य बळाची कमतरता आहे. दुसरीकडे नव्याने पोलिस भरती प्रक्रियेसाठी अवधी असून तोपर्यंत ही कंत्राटी पदे भरली जाणार आहेत. यासाठी पोलीस आयुक्तांनी सरकारला विनंती केली होती, ही विनंती आता गृह विभागाने मान्य केली आहे.
मुंबईतील वाढती लोकसंख्या, विस्तार, व्यापार, गुन्हेगारीसह सर्वच बाबतीतील व्याप्ती पाहता मुंबईत पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी, सरकारने पोलीस भरतीची जाहिरातही काढली आहे. मात्र, या जाहिरातीतील पदांची संख्या पुरसे नसल्याने आता कंत्राटी पद्धतीने मुंबईसाठी पोलीस भरती करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ११ महिन्यांच्या कंत्राटी करारानुसार ही भरती होईल.
यावरुन आता आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही राज्यसरकारवर टीका केली आहे. चव्हाण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत टीका केली. "मुंबई पोलीस दलात कंत्राटी स्वरूपात तीन हजार जवानांची भरती करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यासाठी दिलेली कारणेही तर्कसंगत नाहीत. मुंबई पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असून, आगामी काळातील सण-उत्सवांच्या पार्श्वभूमिवर सुरक्षा व्यवस्थेसाठी तात्पुरत्या स्वरूपात ही भरती करण्यात येत असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे. मात्र, मनुष्यबळाची ही कमतरता अचानक निर्माण झालेली नाही किंवा हे सण-उत्सव देखील अचानक ठरलेले नाहीत. कोणते सण केव्हा येणार हे राज्य सरकारला अगोदर ठाऊक नव्हते का? त्या अनुषंगाने वेळीच नियमित भरतीप्रक्रिया का सुरू झाली नाही? राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून तातडीने नियमित भरतीप्रक्रिया सुरू करावी, अशी आमची मागणी आहे, असं पोस्टमध्ये म्हटले आहे.