मुंबई : मार्च महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांमध्ये देशभरातील बॅँकांमधून ५३ हजार कोटी रुपयांची रोकड काढण्यात आली आहे. गेल्या १६ महिन्यांमधील हा उच्चांक आहे.सणासुदीचा काळ तसेच निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणावर बॅँकांमधून रोकड काढली जात असे. यावेळी मात्र कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याच्या तयारीसाठी नागरिकांनी ही रक्कम काढलेली दिसत आहे.
भारतीय रिझर्व्ह बॅँकेकडून विविध बॅँकांना रोकड पुरवठा केला जातो. मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातील याबाबतचा अहवाल रिझर्व्ह बॅँकेने जाहीर केला आहे. त्यावरून १३ मार्चपर्यंत ग्राहकांनी विविध बॅँकांमधून ५३ हजार कोटी रुपयांची रोकड काढल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोना व्हायरसच्या मुकाबल्यामध्ये आगामी काळात काही आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास अडचण येऊ नये, यासाठी रोकड काढली गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
देशभरामध्ये जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे फ्लिपकार्टसारख्या काही आॅनलाइन प्लॅटफॉर्मनी मालाची डिलिव्हरी देणे बंद केले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांना पारंपरिक पद्धतीकडे वळावे लागले आहे. यासाठी डिजिटल पेमेंटऐवजी रोख रक्कम देणे गरजेचे असल्याने नागरिकांनी रोकड काढली असावी, असे मत भारतीय स्टेट बॅँक समूहाचे प्रमुख अर्थसल्लागार एस. के. घोष यांनी व्यक्त केले आहे.
अडचण येऊ नये यासाठीची तरतूद
च्अनेक बॅँकांनी आपल्या ग्राहकांना डिजिटल बॅँकिंगची सुविधा पुरविली असली तरी ग्राहकांकडून रोकड का काढली जात असावी, याचे विश्लेषण अॅक्सिस बॅँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार सौगत भट्टाचार्य यांनी केले आहे. त्यांच्या मते, आगामी काळात लॉकडाउनमुळे बॅँकांची एटीएम सेंटर वा शाखेपर्यंत जाणे शक्य न झाल्यास कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी रोकड रक्कम काढली असण्याची शक्यता आहे.