लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात २,३४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण १८,८६,४६९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७६% एवढे झाले आहे. राज्यात सध्या कोरोनाचे ५२,६५३ इतके सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात रविवारी ३,०८१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ५० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३ टक्के एवढा आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,९०,७५९ झाली आहे तर मृतांचा आकडा ५०,४३८ झाला आहे.
दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ५० मृत्यूपैकी २१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. या ५० मृत्यूमध्ये मुंबई ७, ठाणे ५, ठाणे मनपा २, नाशिक मनपा १, पुणे ३, पुणे मनपा ५, पिंपरी चिंचवड मनपा २, सोलापूर २, बीड १, अकोला मनपा १, अमरावती २, अमरावती मनपा १, नागपूर २, नागपूर मनपा ८, भंडारा ३, चंद्रपूर ४, आणि अन्य राज्य-देशातील एका रुग्णाचा समावेश आहे.
राज्यात मुंबई व ठाण्यात सक्रिय रुग्णांची संख्या दहा हजारांच्या खाली आली आहे; मात्र दुसरीकडे पुण्यात ही संख्या वाढून पुन्हा १५ हजार ९८६ झाली आहे. मुंबईत ६ हजार ७७९ तर ठाण्यात ९ हजार ६२५ रुग्ण उपचाराधीन आहेत. सध्या राज्यात २,२५,३०८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर २,०४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.