११ महिन्यांत हवाई प्रवासाबाबत १० हजार प्रवाशांच्या तक्रारी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 05:06 AM2020-01-18T05:06:16+5:302020-01-18T05:06:35+5:30
१२४० तक्रारी अद्याप प्रलंबित : विमानांंचा विलंब; खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत मांंडले मुद्दे
मुंबई : जानेवारी ते नोव्हेंबर २०१९ या ११ महिन्यांच्या कालावधीत हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी १० हजार ४०२ प्रवाशांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यापैकी १२४० तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत, तर उर्वरित तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
विमानउड्डाण रद्द होणे, उड्डाणाला विलंब होणे, विमानात प्रवेश नाकारणे, विमानातील सेवेचा, खाण्याच्या पदार्थांचा दर्जा वाईट असणे अशा विविध तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. या ११ महिन्यांच्या कालावधीत दाखल करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये दररोज सरासरी सुमारे २८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी आतापर्यंत ८८४८ तक्रारींचे निराकरण करण्यात आले तर १२४० तक्रारी प्रलंबित आहेत.
नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) ने जाहीर केलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात ९३२ जणांनी तक्रारी दाखल केल्या. त्यापैकी ६१६ तक्रारींचे निराकरण करण्यात आले तर ३१६ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. प्रलंबित सर्व तक्रारी एअर इंडियाच्या सेवेबाबत करण्यात आलेल्या आहेत. या ९३२ तक्रारींपैकी सर्वात जास्त ३६१ तक्रारी एअर इंडियाबाबत आहेत, तर त्याखालोखाल ३११ तक्रारी इंडिगोच्या सेवेबाबत आहेत. नोव्हेंबर महिन्यात उड्डाण रद्द झाल्याचा फटका ४१ हजार ८२३ प्रवाशांना बसला होता. त्यांना पुरवण्यात आलेल्या विविध सुविधांवर ५० लाख ७३ हजार खर्च करण्यात आले.
उड्डाणाला २ तासांपेक्षा जास्त विलंब झाल्याचा फटका २ लाख ६५ हजार ३६० प्रवाशांना बसला. त्यांना पुरवण्यात आलेल्या सुविधांसाठी १ कोटी ९९ लाख ९७ हजार रुपये खर्च करण्यात आले. विमानात प्रवेश नाकारल्याचा फटका २२८९ प्रवाशांना बसला. त्यासाठी पुरवण्यात आलेल्या सुविधांसाठी ९२ लाख ७३ हजार रुपये खर्च करण्यात आले.
तक्रारींचे प्रमाण
जानेवारी महिन्यात ९१७, फेब्रुवारी महिन्यात ९८३, मार्च महिन्यात १६८३, एप्रिलमध्ये १२८१, मे महिन्यात ७४६, जूनमध्ये ७५०, जुलैमध्ये ८५८, आॅगस्टमध्ये ७६०, सप्टेंबरमध्ये ७०१, नोव्हेंबरमध्ये ९३२ तक्रारी दाखल करण्यात आल्या.