मुंबई बाजारपेठेत ३ हजार टन अन्नधान्याची आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:02 PM2018-11-24T12:02:44+5:302018-11-24T12:03:10+5:30
बाजारगप्पा :राज्य शासनाने बाजार समितीचे कार्यक्षेत्र मार्केट आवारापुरते मर्यादित केल्याचा परिणाम मुंबई बाजार समितीवर झाला आहे.
- नामदेव मोरे (नवी मुंबई)
राज्य शासनाने बाजार समितीचे कार्यक्षेत्र मार्केट आवारापुरते मर्यादित केल्याचा परिणाम मुंबई बाजार समितीवर झाला आहे. धान्य व मसाला मार्केटमधील प्रतिदिन तीन हजार टन आवक घटली आहे. आवक घसरल्याचा परिणाम बाजारभाव वाढून मुंबईकरांच्या स्वयंपाकगृहाचे अर्थशास्त्र बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. २५ सप्टेंबरला शासनाने अध्यादेश काढून बाजार समित्यांचे अधिकार मार्केट आवारापुरतेच मर्यादित केले आहेत. अध्यादेशापूर्वी मुंबईमध्ये रोज २२०० ते २५०० टन मसाला, साखर व सुकामेव्याची आवक होत होती. ५००० ते ५६०० टन अन्नधान्याची आवक होत होती. सर्वच बाजारभाव नियंत्रणात होते; परंतु अध्यादेशानंतर २० दिवसांमध्ये दोन्ही मार्केटच्या आवकमध्ये रोज सरासरी तीन हजार टनांचा फरक पडू लागला आहे.
आॅक्टोबरमध्ये रोज ७०० टन गव्हाची आवक होऊन होलसेल मार्केटमध्ये २२ ते २६ रुपये किलो बाजारभाव मिळत होता. सद्य:स्थितीमध्ये आवक ५०० टनांवर आली असून, बाजारभाव एक रुपयाने वाढून २३ ते २७ रुपये एवढे झाले आहेत. तांदळाची गेल्या महिन्यात सरासरी २८०० टन आवक होत होती. साधा तांदूळ २८ ते ३७ रुपये किलो दराने विकला जात होता. सद्य:स्थितीमध्ये आवक १७०० ते २००० टनांवर आली आहे. एक हजार टनांपेक्षा जास्त आवक घसरली आहे. बाजारभावही एक ते दोन रुपयांनी वाढले आहेत. गेल्या महिन्यात २०० ते ३०० टन ज्वारीची आवक होत होती. सद्य:स्थितीमध्ये आवक १५० ते २०० टनांवर आली असून, बाजारभाव दोन रुपयांनी वाढून प्रतिकिलो २० ते ३८ रुपये एवढे झाले आहेत.
डाळींच्या आवकवरही मोठा परिणाम झाला आहे. आॅक्टोबरच्या अखेरीस व नोव्हेंबरच्या सुरुवातीला दिवाळीनिमित्त चना डाळीची जवळपास २०० टन आवक होऊन होलसेल मार्केटमध्ये ५१ ते ५५ रुपये किलो दराने ती विक्री होत होती; परंतु सद्य:स्थितीमध्ये ही आवक ४० ते ८० टनांवर येऊन ठेपली आहे. तूर डाळीची आवक ३०० टनांवरून २०० टनांवर आली आहे. शेंगदाणेही २०० टनांवरून ६० ते १०० टनांवर आले आहेत. मसाला मार्केटमधील आवकवरही गंभीर परिणाम झाले आहेत.
दक्षिणेकडील राज्यांमधून मुंबईत रोज होणारी सरासरी ८०० टन आवक आता ५०० टनांवर आली आहे. शासनाच्या निर्णयानंतर मार्केटमधील व्यापारीही बाहेर माल साठवू लागले आहेत. मार्केटमध्ये माल आल्यास येथील माथाडी कामगारांना जादा मजुरी द्यावी लागते. बाजार फी भरावी लागते. यामुळे एपीएमसीच्या बाहेर एमआयडीसीमधील गोडाऊन व शीतगृहांमध्ये मालाची साठवणूक सुरू झाली आहे. पुढील आठवड्यात शासनाच्या धोरणांविरोधात व्यापाऱ्यांसह माथाडी कामगारांनीही आंदोलनाचा इशारा दिला असून, मार्केट एक दिवस बंद ठेवले जाणार आहे. या आंदोलनाचा परिणामही बाजारभावावर होण्याची शक्यता आहे.