दावोस आर्थिक परिषदेत ३० हजार कोटींचे करार, ६६ हजार रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 09:22 AM2022-05-24T09:22:34+5:302022-05-24T09:22:59+5:30

राज्यात ६६ हजार रोजगारनिर्मिती होणार

30,000 crore agreement at Davos Economic Conference | दावोस आर्थिक परिषदेत ३० हजार कोटींचे करार, ६६ हजार रोजगार

दावोस आर्थिक परिषदेत ३० हजार कोटींचे करार, ६६ हजार रोजगार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जागतिक आर्थिक परिषदेत विविध देशांतील २३ कंपन्यांनी सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. त्याद्वारे सुमारे ६६ हजार जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. सोमवारी झालेल्या विविध गुंतवणूक करारांमध्ये ५५ टक्क्यांहून अधिक गुंतवणूक सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान आदी देशांतील आहे. 

प्रामुख्याने औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, पेपर पल्प व अन्न प्रक्रिया, स्टील, माहिती-तंत्रज्ञान, डेटा सेंटर, लॉजिस्टिक आदी क्षेत्रांचा या गुंतवणुकीत समावेश आहे. दावोस येथील महाराष्ट्र लाऊंजमध्ये झालेल्या सामंजस्य करारात एकूण ३०,३७९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. विविध सामंजस्य करारावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलिकनेर आदी उपस्थित होते. मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत १२१ सामंजस्य करार झाले आहेत. याद्वारे सुमारे ४ लाख रोजगार मिळणार आहेत.

सामंजस्य करार
n इंडोरामा कॉर्पोरेशन आणि इंडोकाऊंट इंडस्ट्रीज लिमिटेड यासारख्या प्रमुख वस्त्रोद्योग कंपन्या अनुक्रमे नागपूर आणि कोल्हापूर या महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग केंद्रांमध्ये गुंतवणूक करणार आहेत.
n जगातील सर्वांत मोठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आयटी कंपनींपैकी एक मायक्रोसॉफ्ट पुण्यात डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी रक्कम ३,२०० कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.
n इंडोनेशियातील एक अग्रगण्य लगदा आणि कागद उत्पादक कंपनी आशिया पल्प अँड पेपरची (एपीपी) संस्था सिनर्मास पल्प अँड पेपर प्रायव्हेट लिमिटेड रायगडमध्ये कागद आणि लगदा उत्पादनासाठी १०,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
n हॅवमोर आइस्क्रीम प्रायव्हेट लिमिटेड पुण्यात आइस्क्रीम तयार करण्यासाठी युनिट सुरू करत असल्याने फूड अँड ॲग्रो प्रोसेसिंगलाही वाव मिळणार आहे. सोनई इटेबल आणि गोयल प्रोटिन्स तेल कंपन्यांचा यात समावेश आहे.

Web Title: 30,000 crore agreement at Davos Economic Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.