‘त्या’ ३०४ गिरणी कामगारांना मिळाले हक्काचे घर!
By सचिन लुंगसे | Published: February 3, 2024 04:58 PM2024-02-03T16:58:52+5:302024-02-03T16:59:34+5:30
‘बॉम्बे डाईंग’ व ‘श्रीनिवास मिल’मधील घरांच्या चाव्यांचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळातर्फे २०२० मध्ये बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर केलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र ३०४ गिरणी कामगार-वारस यांना नवव्या व दहाव्या टप्प्याअंतर्गत नुकतेच घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉल येथे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण व गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाला गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, उपमुख्य अधिकारी योगेश महाजन उपस्थित होते.
बंद, आजारी अशा ५८ गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता कालबद्ध विशेष अभियान सुरू आहे. या अभियानाला गिरणी कामगार, वारसांचा वाढता प्रतिसाद बघता या अभियानाला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या या विशेष अभियानात गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने एकूण १,०६,८५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ८७,६९५ अर्जदार पात्र ठरले असून, उर्वरित अर्जांची छाननी करून पात्र-अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे.
दहा टप्प्यांत चावीचे वाटप
आतापर्यंत २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र व सदनिकेच्या विक्री किमतीचा, मुद्रांक शुल्काचा भरणा केलेल्या १७७४ गिरणी कामगारांना १५ जुलैपासून दहा टप्प्यांत सदनिकांच्या चावीचे वाटप करण्यात आले आहे.
नव्याने कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही
मुंबई मंडळ व कामगार विभाग यांच्यातर्फे सोडतीतील उर्वरित गिरणी कामगार/वारस यांची पात्रता निश्चित करण्याचे काम वेगात सुरू आहे. या गिरणी कामगार/वारस यांची पात्रता लवकर निश्चित करून त्यांना सदनिकांच्या चाव्या देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऑफलाइन अथवा ऑनलाइन पद्धतीने यापूर्वी कागदपत्रे सादर केलेल्या गिरणी कामगार, वारसांना नव्याने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.