Join us

मुंबईतील ‘खड्डेमुुक्ती’साठी ३१ मेची डेडलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 7:13 AM

मुंबईत अनेक विकास प्रकल्प सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे; पण महापालिकेनेही ‘खड्डेमुक्त’ मुंबईसाठी तब्बल एक हजार १०६ रस्त्यांचे काम हाती घेतले आहे. यापैकी सध्या ५२२ रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आली आहेत.

मुंबई - मुंबईत अनेक विकास प्रकल्प सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे; पण महापालिकेनेही ‘खड्डेमुक्त’ मुंबईसाठी तब्बल एक हजार १०६ रस्त्यांचे काम हाती घेतले आहे. यापैकी सध्या ५२२ रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये ४६ मुख्य रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. मात्र, पावसाळ्याला अवघा एक महिना उरला असल्याने ३१ मेपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनापुढे आहे.मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने प्राधान्यक्रम ठरवून रस्त्यांची डागडुजी महापालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार यावर्षी एक हजार १०६ रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. यापैकी ५२२ कामे पावसाळ्यापूर्वी, तर उर्वरित ५८४ कामे पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये अनुक्रमे ४६ आणि २७ मुख्य रस्त्यांचा समावेश आहे. वर्षाच्या सुरुवातीला आठशेहून अधिक रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली होती. यापैकी एप्रिल अखेरपर्यंत ८७९ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती रस्ते व वाहतूक खात्याचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी दिली.मुंबईत मेट्रो, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण अशा विविध प्राधिकरणांची विकासकामे मुंबईत सुरू आहेत. मात्र, या खोदकामांमुळे त्या परिसरात पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका आहे. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होणार असल्याने ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ववत करण्याची ताकीदच महापालिकेने संबंधित प्राधिकरणांना दिली आहे. मात्र, अनेक ठिकाणी महापालिकेच्या रस्त्यांची कामे सुरू असल्याने या भागांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मेची डेडलाइन पालिका प्रशासनाने रस्ते विभागाला दिली आहे.रस्त्यांच्या कामांची केली वर्गवारीमहापालिकेकडून रस्त्यांच्या कामांची वर्गवारी करण्यात आली आहे. यामध्ये प्रकल्प रस्ते व प्राधान्यक्रम रस्ते अशा दोन प्रमुख वर्गवारी आहेत. प्रकल्प रस्ते या वर्गवारी अंतर्गत पुनर्बांधणी करण्यात येणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे. स्टॅक समिती यांच्या सल्ल्यानुसार तयार केलेल्या धोरणानुसार रस्त्याचा पाया, खडीकरण, पृष्ठीकरण इत्यादी सर्व कामांचा यात समावेश होतो.एप्रिल २०१८पर्यंत रस्त्यांची ८७९ कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये प्राधान्यक्रम १ अंतर्गत असणाºया रस्त्यांच्या सर्व म्हणजेच १०७कामांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त प्राधान्यक्रम २ अंतर्गत असणारी ३४७ कामे, प्राधान्यक्रम ३ अंतर्गत ६१ कामे, तर ३६४ प्रकल्प रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत.प्रकल्प रस्त्यांच्या ६४८ कामांमध्ये ३६ जंक्शनच्या कामांचा समावेश आहे. यापैकी ३११ कामे मेअखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यामध्ये २९ जंक्शनच्या कामांचा समावेश आहे. तर पावसाळ्यानंतर ३३७ रस्त्यांची कामे सुरू होणार आहेत. यामध्ये सात जंक्शनच्या कामांचा समावेश आहे.यावर्षी प्राधान्यक्रम दोन व तीन अंतर्गत रस्त्यांच्या पुनर्पृष्ठीकरणाची ४५८ कामे करण्यात येणार आहेत. या कामांमध्ये ३७ जंक्शनच्या कामांचा समावेश आहे. यापैकी २११ कामे मेअखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यामध्ये १७ जंक्शनच्या कामांचा समावेश आहे. तर पावसाळ्यानंतर रस्त्यांची २४७ कामे हाती घेतली जाणार आहेत. यामध्ये २० जंक्शनच्या कामांचा समावेश आहे.

टॅग्स :मुंबईखड्डेमुंबई महानगरपालिका