Join us  

३१ लाखांचे रक्तचंदन पकडले

By admin | Published: October 12, 2014 10:56 PM

शहरातून रक्तचंदन घेऊन मुंबईकडे जाण्यासाठी निघालेला ट्रक मध्यरात्री कर्जत आणि चौकमधील वन विभागाने पकडला.

कर्जत : शहरातून रक्तचंदन घेऊन मुंबईकडे जाण्यासाठी निघालेला ट्रक मध्यरात्री कर्जत आणि चौकमधील वन विभागाने पकडला. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर, वनविभागाने तब्बल सहाशे गाड्या रात्री तपासल्या आणि मध्यरात्री साडेबारा वाजता एक ट्रक तपासला असता त्यात रक्तचंदन सापडले. या ट्रकमध्ये साधारण पाच टन रक्तचंदन पकडले असून त्याची बाजारभावाप्रमाने किंमत एकतीस लाख असल्याचे पोलिसांनी सांगितले. वनविभागाचे अधिकारी, चंदनशिवे यांना रक्तचंदन असलेला ट्रक कर्जत रस्त्याने चौक मार्गे मुंबईकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी गाड्यांची तपासणी सुरू केली. शनिवारी सायंकाळी सहापासून मुंबई- पुणे रस्त्यावर चौक फाटा येथे पोहचले. तेथे आसपासच्या पाच किलोमीटर भागातील सर्व धाब्यावरील गाड्या तपासण्यास सुरुवात केली. बदलापूर भागातील जंगलातून आणलेले ट्रकभर रक्तचंदन नेरळपासून कर्जत असा प्रवास करीत चौक येथे तो ट्रक पोहचला होता. मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावर वन विभागाने पनवेल आणि दांड फाटा येथे गाड्यांची तपासणी सुरू केली असता, मध्यरात्री चौक फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या अरु ण ढाबा येथे वन विभागाने तो ट्रक पकडला.त्यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात अंधार असल्याने ट्रक (टीएन-१८,क्यू ९९८४) घेवून आलेले सर्व जण पसार झाले. पकडलेल्या रक्तचंदनाचे वजन पाच टन एवढे असून त्याची बाजारातील किंमत जवळपास एकतीस लाख असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.