Join us

अजूनही ३१ टक्के जागा रिक्त; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया

By स्नेहा मोरे | Published: October 25, 2023 6:03 PM

एकीकडे अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत असताना दुसरीकडे अजूनही काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई: अकरावी प्रवेशाच्या नियमित आणि विशेष फेऱ्यानंतरही अजूनही मुंबई क्षेत्रातील ३१ टक्के जागा म्हणजेच ९० हजार १७५ जागा रिक्त असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. यातील सर्वाधिक जागा या विनाअनुदानित महाविद्यालयांतील आहेत.

एकीकडे अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत असताना दुसरीकडे अजूनही काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत आहे. अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या नियमित प्रवेशफेऱ्या, सात विशेष फेऱ्यांनंतर १९ ऑक्टोबरपासून दैनंदिन गुणवत्ता फेरीला सुरूवात झाली. या फेरीत विद्यार्थ्यांच्या दैनिक गुणवत्तेवर आधारित प्रवेश देण्यात आले आहेत. मुंबई विभागातून आतापर्यंत पार पडलेल्या चार दैनंदिन गुणवत्ता याद्यांमधून ३०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याने आता बुधवारी प्रक्रियेची अखेरची दैनंदिन गुणवत्ता फेरी संपली आहे. यानंतर आता अकरावी आॅनलाइन प्रवेशाची प्रक्रिया पुन्हा राबविली जाणार नसून आता प्रवेश घेता येणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

अधिकचे तास घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आदेश

प्रवेशाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील म्हणजेच नियमित फेऱ्यांमध्ये प्रवेश विद्यार्थ्यांचा बहुतांश अभ्यासक्रम झाला आहे. पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण करुन परीक्षांचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे आता प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र पूर्ण करण्याचे आव्हान कनिष्ठ महाविद्यालयांसमोर आहे. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहामाही परीक्षा नियोजनाची धांदल सुरू असताना आता या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र कधी पूर्ण करणार असा सवाल उपस्थित झाला आहे. तर दुसरीकडे वाढीव तास घेऊन या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

एकूण महाविद्यालय १०२२

एकूण विद्यार्थी २९०६७४

प्रवेश घेतलेले २६७८६७

प्रवेश न मिळालेले २२८०७

शाखानिहाय

शाखा प्रवेश घेतलेले विद्यार्थी

कला २६७१५

वाणिज्य १४२०७५

विज्ञान ९६३६६

एचएसव्हीसी २७११

एकूण २६७८६७

कोटा निहाय

कोटा प्रवेश घेतलेले विद्यार्थी

कॅप २११९३४

इनहाऊस ९४६७

अल्पसंख्याक ३६३७९

व्यवस्थापन १००८७

एकूण २६७८६७

टॅग्स :महाविद्यालय