Join us

३१० प्रवासी थाेडक्यात बचावले, वनविभागाकडून मृत्यूची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 8:24 AM

दुबईहून मुंबईत येत असलेल्या एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमान क्रमांक ईके ५०८ मध्ये ३१० प्रवासी होते. पक्ष्यांच्या धडकेने विमानास मोठा धोका निर्माण झाला होता. ते कोसळले असते तर मोठी जीवितहानी झाली असती. 

मुंबई/नवीमुंबई : दुबईहून मुंबईत येत असलेल्या एमिरेट्स कंपनीच्या विमानाला घाटकोपर येथे सोमवारी रात्री ८:४० वाजता फ्लेमिंगो पक्ष्यांचा एक थवा धडकला. यामध्ये ३९ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला. ठाणे खाडी परिसरातील फ्लेमिंगोंच्या अधिवासावर होत असलेल्या अतिक्रमणामुळे हे पक्षी भरकटल्याने अपघात घडला असावा, असा अंदाज आहे. या घटनेत विमानातील ३१० प्रवासी थोडक्यात बचावले.  

दुबईहून मुंबईत येत असलेल्या एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमान क्रमांक ईके ५०८ मध्ये ३१० प्रवासी होते. पक्ष्यांच्या धडकेने विमानास मोठा धोका निर्माण झाला होता. ते कोसळले असते तर मोठी जीवितहानी झाली असती. 

विमानाचे नुकसान दूबईहून आलेले इके ५०८ हे विमान मुंबई विमानतळावर उतरत असताना त्याला पक्ष्यांना धडक बसली. विमान सुरक्षितपणे उतरले. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. तथापि अनेक फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाला. आम्ही या प्रकरणात अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत. या घटनेत विमानाचेही नुकसान झाले आहे. २० मे रोजी दुबईला जाणारे इके ५०९ उड्डाण रद्द करण्यात आले. याबद्दल एमिरेट्सच्या प्रवक्त्याने दिलगिरी व्यक्त केली. 

फ्लेमिंगोंच्या मृत्यूच्या घटनेनंतर नॅट कनेक्टचे बी. एन. कुमार यांनी नागरी उड्डाण महासंचालकांना ई-मेल पाठवून ही घटना कशी घडली आणि वैमानिकाला रडारवर पक्ष्यांचा थवा कसा लक्षात आला नाही, प्रवाशांच्या जीवितास हानी पोहोचली असती तर त्यास कोणाला जबाबदार धरले असते, असे प्रश्न करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

अपघातानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासही धाेक्याचा इशारा मिळाला असल्याचे बी. एन. कुमार म्हणाले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही आपत्ती ओढवणारच होती. 

पक्ष्यांच्या धडकेमुळे जर कोणत्याही विमान प्रवाशांच्या जिवास धोका झाला असता, तर ती जागतिक पातळीवर प्रमुख बातमी झाली असती. परंतु, ३९ पक्ष्यांच्या मृत्यूमुळे अधिकाऱ्यांना, विशेषत: शहरी नियोजनकारांना त्याचे काहीही सोयरसूतक नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :विमानमुंबई