मुंबई : गेल्या १० वर्षांत मुंबईत एकूण ४८ हजार ४३४ आगीच्या घटनांची नोंद झाली असून त्यामुळे तब्बल ६०९ लोकांचा मृत्यू आणि ८९ कोटी ०४ लाख ८६ हजार १०२ रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. यातील धक्कादायक माहिती म्हणजे एकूण घटनांत झोपडपट्टीमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांची संख्या ही ३ हजार १५१ इतकी आहे. परिणामी, मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील सुरक्षेवर अग्निशमन दलासह मनपा प्रशासन आणि राज्य शासनाने गंभीर उपाययोजना करण्याची गरज आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी व्यक्त केली आहे.मुंबईतील वांद्रे येथे नर्गिस दत्त नगर या झोपडपट्टीला मंगळवारी लागलेल्या आगीनंतर येथील झोपडपट्ट्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शेख यांनी माहिती अधिकारात मुंबई अग्निशमन दलाकडे २००८ ते २०१८ सालातील मुंबईतील आगीच्या घटनांची माहिती मागितली होती. त्यात मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षांत लागलेल्या ४८ हजार ४३४ आगीच्या घटनांपैकी १ हजार ५६८ घटना गगनचुंबी इमारतींत, ८ हजार ७३७ घटना रहिवासी इमारतींत, ३ हजार ८३३ घटना व्यावसायिक इमारतींत आणि ३ हजार १५१ घटना झोपडपट्ट्यांमध्ये लागल्याची नोंद आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यामधील सर्वाधिक घटनांचे कारण हे शॉर्ट सर्किट आहे. मुंबईतील आगीच्या एकूण ४८ हजार ४३४ घटनांमधील तब्बल ३२ हजार ५१६ घटना अर्थात ६६ टक्क्यांहून अधिक घटना या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. तर १ हजार ११६ घटनांना गॅस सिलिंडर गळतीचे कारण आहे. तसेच विविध कारणांमुळे ११ हजार ८८९ घटनांची नोंद आहे.आगीच्या १ हजार ५६८ घटना गगनचुंबी इमारतींत, ८ हजार ७३७ घटना रहिवासी इमारतींत घडल्या आहेत.१ हजार ११६ घटनांना गॅस सिलिंडर गळतीचे कारण आहे. तसेच विविध कारणांमुळे ११ हजार ८८९ घटनांची नोंद आहे.१० वर्षांत ६०९ मृत्यूगेल्या १० वर्षांत मुंबईत लागलेल्या आगीच्या एकूण घटनांत तब्बल ६०९ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३६८ पुरुष, २१२ स्त्रिया आणि २९ लहान मुलांचा समावेश आहे. तसेच आगीच्या घटनांत मुंबईकरांचे तब्बल ८९ कोटी, ०४ लाख, ८६ हजार, १०२ रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
मुंबईत १० वर्षांत झोपड्यांत ३ हजार १५१ आगीच्या घटना; ८९ कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 1:02 AM