मुंबई - राज्यातील गृह प्रकल्पांत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची फसवणूक होऊ नये आणि प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी महारेराने गृह प्रकल्पांची झाडाझडती सुरू केली असून, वित्तीय संस्थेच्या मदतीने प्रचंड गुंतवणूक असलेल्या प्रकल्पांचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. त्यानुसार, संस्थेने दिलेल्या पहिल्या अहवालात ३१३ प्रकल्पांवर रेड फ्लॅग लावण्यात आला असून, या प्रकल्पांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
ज्यांच्याकडून प्रतिसाद मिळणार नाही, त्यांच्याकडे या कामाची काय स्थिती आहे? याची माहिती आता थेट प्रकल्पस्थळी जाऊन घेतली जाणार आहे. विकासकांनी स्वत: महारेराकडे सादर केलेल्या माहितीचा अभ्यास करून वित्तीय संस्थेने प्रकल्पातील विसंगती शोधल्या आहेत. यात प्रकल्पावर ७५ टक्क्यांवर खर्च होऊनही प्रत्यक्षात प्रकल्पाचे काम ५० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. प्रकल्प हस्तांतरित करण्याची मुदत ६ महिन्यांवर आली असताना प्रत्यक्षात प्रकल्पाचे काम ५० टक्क्यांपेक्षाही कमी झाले आहे. प्रकल्पाविरुद्ध ग्राहकांच्या दहापेक्षा जास्त तक्रारी प्रलंबित आहेत. या मुद्यांच्या आधारे प्रकल्पांचा लेखाजोखा मांडला जात आहेत. यातूनच या ३१३ प्रकल्पातील विसंगती, त्रुटी अधोरेखित करण्यात आलेल्या आहेत. हे प्रकल्प भविष्यात अडचणीत येऊ शकतात. म्हणून महारेराने हे काम सुरू केले आहे.