अग्नितांडवानंतर २४ तासांत पाडली ३१४ बेकायदा बांधकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 07:36 AM2017-12-31T07:36:13+5:302017-12-31T07:36:23+5:30
लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमध्ये मोजोस् ब्रिस्ट्रो आणि वन अबव्ह रेस्टॉरंटच्या अग्नितांडवात १४ जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
मुंबई : लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमध्ये मोजोस् ब्रिस्ट्रो आणि वन अबव्ह रेस्टॉरंटच्या अग्नितांडवात
१४ जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कित्येक महिने बेकायदा बांधकामांवर सुरू असलेली ३१४ उपहारगृहे, मॉल्स, हॉटेलचे बांधकाम
२४ तासांत पाडण्यात आली. सात उपाहारगृहांना टाळेही ठोकण्यात आले.
अग्निकांडानंतर प्रशासनाने ६२४ ठिकाणी तपासणी केली. त्यात जिमखाने, गच्चीवरील रेस्टॉरंट, पब, उपाहारगृह अशा एकूण ३१४ ठिकाणी अनियमितता आढळली. ही बेकायदा बांधकामे पालिकेने एका दिवसात जमीनदोस्त केली. मुंबईतील ही गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठी कारवाई आहे. संबंधित खात्यातील कर्मचारी-अधिकारी, साहाय्यक आयुक्त, उपायुक्त व अतिरिक्त आयुक्त घटनास्थळी उपस्थित राहून कारवाईवर लक्ष ठेऊन होते. अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी सुरक्षा नियमांची पाहणी करत होते. मुंबईतील सर्व उपाहरगृहे, हॉटेल्स, मॉल्स यांनी अग्निसुरक्षेसह सर्व बाबींची तपासणी करावी, नियमांनुसार आवश्यक सुधारणा तातडीने करून घ्याव्यात. अन्यथा तत्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अग्निकांडाची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर २४ तासांत प्रशासनाने कारवाईचा धडाकाच लावला होता.
एक हजार कर्मचाºयांचे पथक
सर्व २४ विभागांमध्ये प्रत्येकी तीन पथक तयार करण्यात आले आहेत. त्यात कनिष्ठ अधिकाºयांपासून अतिरिक्त आयुक्तांपर्यंत तब्बल एक हजार कर्मचाºयांचा समावेश आहे. ४१७ सिलिंडर जप्त करण्यात आले. दक्षिण मुंबईपासून मालाड व मुलुंडपर्यंत कारवाई सुरू आहे.
परळच्या कमला मिल कंपाऊंडमधील ‘स्मॅश’ या मनोरंजन कंपनीचे बेकायदा बांधकामही शनिवारी पाडण्यात आले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची यात भागिदारी आहे.
आरोपी फरार :
वन अबव्हचे संचालक क्रिपेश संघवी, अभिजित मानकर, जीगर संघवी आणि व्यवस्थापकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तिघेही आरोपी फरार झाले आहेत. गोवा, पुणे, गुजरातला तपास पथके रवाना झाली आहेत. लूक आउट नोटीसही जारी करण्यात आली आहे.
मोजोस, वन अबव्ह, पी-२२ विरुद्ध गुन्हे
अनधिकृत बांधकाम, सुरक्षा नियमावलींचे उल्लंघन आणि अतिरिक्त जागेचा वापर केल्याचा ठपका ठेवत पालिकेने दिलेल्या तक्रारीवरून एन. एम जोशी मार्ग पोलिसांनी एमआरटीपी कायद्याअंतर्गत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. त्यात कमला मिलच्या मालकासह मोजोस ब्रिस्ट्रो, वन अबव्ह आणि रघुवंशी मिलमधील पी-२२ च्या संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले.