‘परे’च्या ३१६ लोकल रद्द, प्रवाशांचा गोंधळ संपेना; गर्दीमुळे एसी लोकलचे दरवाजे लागेनात!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 06:59 AM2023-11-01T06:59:15+5:302023-11-01T06:59:26+5:30
कोणत्या फेऱ्या रद्द, कोणत्या पूर्ववत? याचा ताळमेळ नसल्याने प्रवाशांचा गोंधळ
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पश्चिम रेल्वेने खार-गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या बांधकामासाठी ब्लॉक सुरू केल्याने काही लोकल फेऱ्या रद्द आहेत. लोकल २० ते २५ मिनिटे उशिरा धावत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर मंगळवारी ३१६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु पश्चिम रेल्वेने २३३ फेऱ्या रद्द करून ८३ सेवा पूर्ववत केल्या. परंतु कोणत्या फेऱ्या रद्द कोणत्या फेऱ्या पूर्ववत याचा ताळमेळ नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला होता.
लोकल सेवा रद्द त्यातच नियमितपणे धावणाऱ्या लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे दादर, अंधेरी, बांद्रा, बोरिवलीसह इतर सर्वच स्थानकांत प्रवाशांची एकच गर्दी झाली होती. संध्याकाळी कामावरून घरी निघालेल्या मुंबईकरांना लोकलची संख्या कमी असल्याने घरी पोहोचायला उशीर झाला आहे.
बुधवारी, गुरुवारी ११२ फेऱ्या पूर्ववत
मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने बुधवार आणि गुरुवारी ३१६ फेऱ्या रद्द केल्या होत्या.
परंतु प्रवाशांची गर्दी पाहता ११२ फेऱ्या पूर्ववत केल्या असून २०४ फेऱ्या रद्द असणार आहेत.
पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या मेगाब्लॉकमुळे दररोज २०० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गर्दी दररोजच्या तुलनेत २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे.
- मयूर शिंदे, प्रवासी