नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 07:24 AM2024-09-27T07:24:43+5:302024-09-27T07:24:52+5:30

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून (पीएफसी) या कर्जाला मंजुरी मिळाली असून, त्याचा एमएमआरडीएबरोबर कर्ज करार बुधवारी करण्यात आला. 

31673 crores loan sanctioned from PFC to MMRDA for 9 projects | नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर

नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर

मुंबई : तिजोरी रिकामी झाल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली आहे. एमएमआरडीएने हाती घेतलेल्या ठाणे - बोरिवली भुयारी मार्ग, ठाणे कोस्टल रोडसह ठाण्यातील आठ प्रकल्पांच्या कामासाठी ३१ हजार ६७३ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून (पीएफसी) या कर्जाला मंजुरी मिळाली असून, त्याचा एमएमआरडीएबरोबर कर्ज करार बुधवारी करण्यात आला. 

पीएफसीकडून दिल्या जाणाऱ्या एकूण कर्जाच्या रकमेपैकी ठाणे - बोरिवली भुयारी मार्गाच्या कामासाठी १५,०७१ कोटींची रक्कम दिली जाणार आहे. ठाण्यातील उड्डाणपूल, खाडी पूल प्रकल्पांच्या कामासाठी  १६ हजार ६०२ कोटींचे कर्ज दिले जाणार आहे. या प्रकल्पांच्या एकूण किमतीपैकी ८० टक्के रक्कम ही पीएफसीकडून कर्ज स्वरुपात दिली जाणार आहे. उर्वरित २० टक्के रक्कम एमएमआरडीएला उभारावी लागेल. एमएमआरडीएच्या हिश्श्याची काही रक्कम राज्य सरकारकडून अनुदान स्वरुपात दिली जाणार आहे.

कोंडीवर उतारा 

मुंबई आणि ठाण्यातील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून हे प्रकल्प महत्त्वपूर्ण आहेत. त्यामध्ये नुकत्याच निविदांना मान्यता देण्यात आलेल्या ठाण्यातील आठ प्रकल्पांचा समावेश आहे. या रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यावर ठाण्यातील कोंडींचा प्रश्न मिटेल आणि वाहतूक वेगवान होईल, असा दावा करण्यात येत आहे.

...या प्रकल्पांसाठी मिळाले कर्ज 
 ठाणे खाडी किनारा मार्ग (टप्पा १) 
 घाटकोपर ते ठाणेपर्यंत पूर्व मुक्त मार्गाचे विस्तारीकरण
 एनएच ४ ते कटाई नाक्यादरम्यान उन्नत मार्ग  
 कोलशेत ते काल्हेरदरम्यान खाडीपूल आणि जोड रस्ता
 कासारवडवली, ठाणे ते खारबाव, भिवंडीदरम्यान खाडीपूल 
 कल्याण मुरबाड रोड (पाल्मस वॉटर रिसॉर्ट) ते बदलापूर रोड ते पुणे लिंक रोड व कर्जत आणि कसारा रेल्वे लाइन ओलांडणाऱ्या वालधुनी नदीच्या समांतर, उन्नत रस्त्याचे बांधकाम
 ठाणे शहरातील आनंदनगर ते साकेतपर्यंत उन्नत मार्ग
 गायमुख ते पायेगाव दरम्यान खाडीपूल

कंत्राटदारांची नियुक्ती

या सर्व प्रकल्पांच्या कामांसाठी एमएमआरडीएने कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. यातील ठाणे - बोरिवली भुयारी मार्गाचे भूमिपूजन लोकसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आले होते. आता ठाण्यातील आठ प्रकल्पांचे भूमिपूजन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात केले जाणार आहे. त्यानंतर या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
 

Web Title: 31673 crores loan sanctioned from PFC to MMRDA for 9 projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.