मुंबई : राज्यभरात एकूण ३१८ स्कूलबस बेकायदा असून, त्यापैकी ३१६ बसवर कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करत परिवहन विभागाने बेकायदा स्कूलबसविरोधात विशेष मोहीम हाती घेतली होती, यात ही बाब उघड झाली आहे.नियम धाब्यावर बसवून राज्यभर सर्रासपणे बेकायदेशीररीत्या स्कूलबस धावत आहेत. केंद्र सरकारने स्कूलबससंदर्भात आखलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका ‘पॅरेंट टीचर असोसिएशन’ (पीटीए) ने उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी प्रभारी मुख्य न्या. नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.मंगळवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी परिवहन विभागाने स्कूलबस संदर्भात १ ते १५ आॅक्टोबरपर्यंत विशेष मोहीम हाती घेतल्याची माहिती न्यायालयाला दिली. या मोहिमेत राज्यभरात ३१८ बेकायदा स्कूलबस विद्यार्थ्यांची ने-आण करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ३१६ स्कूलबसवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली.>मुंबईत २० बसवर कारवाईसरकारने सादर केलेल्या अहवालानुसार, मुंबईत एकूण ३९ स्कूलबस बेकायदेशीरपणे चालविण्यात येत असून त्यापैकी २० बसवर कारवाई केली. तर ठाण्यातील सात स्कूलबस बेकायदा असून एकाही बसवर कारवाई करण्यात आली नाही. आणखी माहिती सादर करण्यासाठी सरकारी वकिलांनी पाच आठवड्यांची मुदतवाढ मागितली. उच्च न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत सुनावणी तहकूब केली.
राज्यात ३१८ स्कूलबस धावतात बेकायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 5:20 AM