Join us

३१ दिवसांत ३,१९६ गुन्ह्यांची उकल; मुंबई पोलिस २४ तास सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 10:52 AM

नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून मुंबई पोलिस २४ तास सतर्क.

मुंबई : मुंबापुरीत चोरी, घरफोडी, हाणामारी, फसवणूक यांसह गंभीर स्वरूपांचे गुन्हे घडत असतात. नववर्षाचा पहिल्या महिन्यात मुंबईपोलिसांनी ३ हजार १९६ गुन्ह्यांची उकल करून कायम सतर्क असल्याचे दाखवून दिले. जानेवारी महिन्यातील ३१ दिवसांत पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखत या गुन्ह्यांची उकल करत आरोपींना तुरुंगात धाडले आहेत. हे गुन्हे उघडकीस आणल्याप्रकरणी संबंधित पोलिसांना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सन्मानित केले आहे. शहरात ५० दरोड्याच्या घटना जानेवारी महिन्यात घडल्या. या गुन्ह्यांपैकी केवळ ३९ गुन्ह्यांची उकल पोलिसांना करता आली. उर्वरित गुन्ह्यांचा पोलिस तपास करत आहेत.  क्षुल्लक कारण, पूर्ववैमनस्य यातून २७ जणांवर जीवघेणे हल्ले झाले. या गुन्ह्यांचा १०० टक्के तपास पोलिसांनी केला आहे.

नऊ जणांचा खून :

जानेवारी महिन्यात नऊजणांचा खून झाल्याची मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आली होती. त्यापैकी ८ गुन्हे संबंधित पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. 

चौकाचौकात नाकाबंदी :

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी पोलिस ठरावीक कालावधीत चौकाचौकात नाकबंदी करत असतात. या विशेष मोहिमेदरम्यानही पोलिसांच्या हाती अनेकदा गुन्हेगारांसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे लागत आहेत.

भुरट्या चोरांचा धुमाकूळ :

मुंबई शहर व उपनगरांमध्ये भुरट्या चाेरांनी धुमाकूळ घातला आहे. मात्र त्यांच्यावर कावाईसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. त्याद्वारे या चोरांची धरपकड सुरू आहे. 

गेल्या वर्षात गुन्ह्यांचा आलेख वाढता :

१) गेल्या वर्षी अर्थात २०२३च्या जानेवारी महिन्यात एकूण ५ हजार ३०१ गुन्हे नोंदविण्यात आले होते. 

२) त्यापैकी ३९७५ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले होते. 

३) या गुन्ह्यांच्या तुलनेत यंदाच्या चालू वर्षातील जानेवारीत ४ हजार ८०५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी ३ हजार १९६ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. 

टॅग्स :मुंबईपोलिस