मुंबई :मुंबईच्यापासपोर्ट कार्यालयातील कारवाई केलेल्या ३२ भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जीपे, थेट बँक खात्यांमध्ये लाचेचे पैसे घेतल्याचे उघडकीस आले आहे. या अधिकाऱ्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांमध्ये एजंटकडून पैसे जमा झाल्याचे सीबीआयच्या तपासात आढळून आले आहे.
ऑक्टोबर २०२० ते जून २०२४ या कालावधीमध्ये उप-पारपत्र अधिकारी प्रज्ञा वानखेडकर यांच्या सारस्वत बँक आणि बँक ऑफ बडोदा या दोन बँकांतील खात्यांमध्ये एकूण ५१ लाख रुपये पासपोर्ट एजंटकडून जमा झाल्याचे दिसून आले आहे. २६ व २७ जून रोजी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या छापेमारीदरम्यान त्यांच्या फोनची तपासणी केली असता त्यामध्ये त्यांचे अनेक एजंटसोबत देवाणघेवाणीचे मेसेज झाल्याचे आढळले आहे. याच कार्यालयात कार्यरत असलेला पासपोर्ट विभागाचा अधीक्षक उमेश देवाडीगा याच्या खात्यामध्ये ऑक्टोबर २०२० ते जून २०२४ या कालावधीमध्ये एकूण ४ लाख ८ हजार जमा झाल्याचे दिसून आले. तर, मे २०२३ ते मे २०२४ या कालावधी ७ लाख ३७ हजार रुपये जमा झाल्याचेही दिसून आले आहे. त्याने यापैकी बरीचशी रक्कम जीपेच्या माध्यमातून स्वीकारल्याची माहिती आहे.