Join us  

नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेप्रकरणी ३२ गुन्हे 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 7:00 AM

Narayan Rane : या यात्रेच्या निमित्ताने मुंबईत जोरदार राजकीय वातावरण तापले होते. येत्या काळातही राजकीय वातावरण ढवळून निघण्याची  शक्यता आहे.

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत गुरुवारी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या प्रकरणी मुंबईत गुरुवारी १९ तर शुक्रवारी १३ असे एकूण ३२ गुन्हे दाखल करण्यात आले. या यात्रेच्या निमित्ताने मुंबईत जोरदार राजकीय वातावरण तापले होते. येत्या काळातही राजकीय वातावरण ढवळून निघण्याची  शक्यता आहे.मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून राणे यांनी यात्रेला सुरुवात केली. तेथून टीचर्स कॉलनी हायवे, सायन सर्कल, दादर, वरळी नाका, गिरगाव चौपाटी, हुतात्मा चौक, अशा विविध मार्गांतून त्यांची यात्रा गेली. या वेळी कोरोनासंबंधित लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन झालेले पाहावयास मिळाले. त्यानुसार, मुंबई पोलिसांनी शहरातील विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर आणि गोवंडी पोलीस ठाण्यासह विविध पोलीस ठाण्यांत भादंवि कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५१ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये, एकूण ३२ गुन्हे दाखल केल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिली आहे. आयोजकांसह यात सहभागी झालेले नेते आणि कार्यकर्त्यांविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :नारायण राणे गुन्हेगारी