मुंबई - येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सोन्याची 32 बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. विमानतळ पोलीस अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या या सोन्याच्या बिस्कीटांचे वजन 3729 ग्रॅम एवढे असून त्यांची अंदाजे किंमत 1 कोटी 4 लाख रुपये एवढी आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकास ताब्यात घेतले आहे.
मुंबई विमानतळावर एअर इंटेलिजन्सच्या कस्टम विभागाने एका प्रवाशाच्या संशयास्पद हालचालींवरुन त्यास ताब्यात घेतले. मोहम्मद कुन्ही कोपा इर्शाद असे या प्रवाशाचे नाव असून तो दुबईतून मुंबईला आला होता. मोहम्मदकडून तेथील कचऱ्याच्या डब्ब्यात ही सोन्याची 32 बिस्किटे टाकण्यात येत होती. त्यावेळी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. याप्रकरणी विमानतळ अधिकाऱ्यांनी कस्टम विभागातील कायदा 1962 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुंबई विमानतळ कस्टम विभागाचे आयुक्त व्ही रामा मॅथीव्ह यांनी याबाबत माहिती दिली असून पुढील तपास सुरू आहे.