Join us  

तीन महिन्यांत ३२ लाख प्रवाशांचे उड्डाण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 8:45 AM

गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत या प्रवासी संख्येत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मुंबई : मुंबई विमानतळावरून अनेक नव्या देशांकरिता विमान सेवा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईतून परदेशात जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मुंबईतून आतापर्यंत ३२ लाख लोकांनी प्रवास केल्याची माहिती असून गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत या प्रवासी संख्येत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आजही दिल्लीने आपला पहिला क्रमांक कायम राखला असून या कालावधीमध्ये दिल्ली विमानतळावरून एकूण ४३ लाख लोकांनी प्रवास केला. या क्रमवारीत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर असून चेन्नईने १३ लाख प्रवासी संख्येसह तिसरा क्रमांक गाठला आहे. या कालावधीमध्ये मुंंबईतून विविध देशांत जाणाऱ्या विमानांच्या संख्येतदेखील लक्षणीय वाढ झाली आहे.

या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये मुंबईतून १९ हजार ८०० विमानांनी विविध देशांसाठी उड्डाण केले. गेल्यावर्षी याच कालावधीमध्ये ही विमानसंख्या १४ हजार इतकी होती. तर दिल्लीत गेल्यावर्षीच्या तिमाहीत १९ हजार ६०० विमानांनी परदेशासाठी उड्डाण केले होते. यंदा ती संख्या २५ हजार इतकी झाली आहे.