‘गव्हर्नमेंट लॉ कॉलेज’च्या ३२ विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 03:26 AM2019-05-01T03:26:02+5:302019-05-01T03:26:50+5:30
मूळ परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्यायला मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजच्या प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे तब्ब्ल ३२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे.
मुंबई : एलएलबीच्या तिसऱ्या आणि पाचव्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल विषयाची पुनर्परीक्षा २६ एप्रिल रोजी घेण्यात आली. २७ एप्रिल रोजी मूळ परीक्षेचा निकाल आणि पुनर्परीक्षेचा निकाल एकदमच घोषित करण्यात आला. मात्र, मूळ परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्यायला मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजच्या प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे तब्ब्ल ३२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे. या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी संघटनेकडे धाव घेतली आहे.
कॉलेजांकडे परीक्षा असल्यामुळे कॉलेजेस मनमानी कारभार चालवीत असल्याचा आरोप स्टुडंट लॉ कौंसिलने केला असून, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या संचालकांनी यामध्ये विशेष लक्ष देण्याची मागणी केली आहे. मूळ परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाकडे पुनर्परीक्षेची मागणी केली होती. यासाठी ते निवेदन घेऊन प्राचार्यांकडे गेले. मात्र, एकदा पुनर्परीक्षा झाल्यावर पुन्हा पुनर्परीक्षा होऊ शकत नसल्याचे सांगत, त्यांनी विद्यार्थ्यांची मागणी फेटाळून लावली. हे ३२ विद्यार्थी तब्ब्ल ४ ते ५ तास प्राचार्यांच्या केबिनबाहेर उभे असूनही त्यांना दाद मिळाली नसल्याची माहिती एका विद्यार्थिनीने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
या विद्यार्थ्यांनी आपल्या सह्यांचे निवेदन देऊन संघटनेकडे धाव घेतली. मुंबई विद्यापीठाकडे परीक्षा नसल्या, तरी त्यांनी या विषयांची दखल घेऊन त्यावर कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे मत, मुंबई स्टुडंड लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी व्यक्त केले. ही परीक्षा कॉलेजच्या अखत्यारित येत असल्याने, विद्यापीठ प्रशासनाने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.