Join us

राज्यात काळ्या बुरशीच्या आजाराचे ३२०० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:06 AM

राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहितीराज्यात काळ्या बुरशीच्या आजाराचे ३२०० रुग्णराज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहितीलोकमत न्यूज नेटवर्क...

राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

राज्यात काळ्या बुरशीच्या आजाराचे ३२०० रुग्ण

राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना झालेल्या किंवा कोरोनातून बरे झाल्यानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिसच्या आजाराचे राज्यात ३२०० रुग्ण असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली. तर दरदिवशी १४,००० इंजेक्शनची आवश्यकता असताना राज्य सरकारला केवळ दरदिवशी सरासरी ४००० ते ५००० इंजेक्शन मिळत आहेत, अशी माहिती राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी न्या. अमजद सय्यद व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली.

देशात म्युकरमायकोसिस या आजारावर लस किंवा औषध निर्मिती करणाऱ्या तीन कंपन्या असल्याने व ते तयार करण्यासाठी २० दिवस लागत असल्याने काळ्या बुरशीवरील औषधांचा तुटवडा आहे, अशीही माहिती कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली.

कुंभकोणी व मुंबई महापालिकेचे वकील अनिल साखरे यांनी न्यायालयाला सांगितले की, यासंदर्भातील सर्व माहिती पालिका व राज्य सरकार संकलित करून ठेवत आहे. राज्यात हाफकीन फार्मा काळ्या बुरशीच्या आजारावर औषध तयार करते; पण सध्याच्या व्यवस्थेनुसार सर्व औषधे केंद्र सरकारकडे जमा करणे बंधनकारक आहे. त्यानंतर केंद्र सरकार राज्य सरकारला औषधांचा पुरवठा करते. या आजारावर ६ जूनपर्यंत पुरेशी औषध उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे, असे कुंभकोणी यांनी म्हटले.

दरम्यान, केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, या आजाराबाबत केंद्र सरकारने काही सूचना केल्या आहेत. तज्ज्ञांचे टास्क फोर्स काम करत आहे. काळ्या बुरशीच्या आजाराचे सर्वात जास्त रुग्ण कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहेत. या तिन्ही राज्यांत जूनमध्ये इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येईल. तर न्यायालयाने स्टेरॉइडचा अतिरेक थांबवण्यासाठी उपाययोजना आखण्याची सूचना केंद्र सरकारला करत या याचिकेवर २ जून रोजी सुनावणी ठेवली.