३२२ पात्र गाळेधारकांच्या सदनिकांची १४ नोव्हेंबर रोजी होणार निश्चिती
By सचिन लुंगसे | Published: November 11, 2022 06:06 PM2022-11-11T18:06:56+5:302022-11-11T18:07:25+5:30
वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील गुलझारीलाल नंदा सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
मुंबई : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे वरळी बीडीडी चाळीतील इमारत क्रमांक ३२, ३३, ३९,४० व सावली इमारतीमधील ३२२ पात्र गाळेधारकांना पुनर्विकासाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्विकास इमारतीमध्ये यादृच्छिक (Randomised Allotment Tenement) पद्धतीने संगणकीय प्रणालीद्वारे सदनिकांचा क्रमांक निश्चितीचा कार्यक्रम १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील गुलझारीलाल नंदा सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. सदनिका निश्चितीच्या कार्यक्रमासाठी उच्च स्तरीय देखरेख समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीच्या उपस्थितीमध्ये पात्र गाळेधारकांकरिता सदनिका क्रमांक निश्चितीसाठी सोडत काढण्यात येणार आहे. या सदनिका निश्चितीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी संबंधित चाळींमधील प्रथम येणाऱ्या ५ सदस्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या गाळेधारकांनी संबंधित चाळीमधील गाळेधारक असल्याबाबत पुरावा सादर करणे आवश्यक आहे, असे आवाहन मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे करण्यात आले आहे.