नाशिकमध्ये ३२५ कोटींचे एमडी जप्त; मुंबई पोलिसांची कारवाई, १२ अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 05:25 AM2023-10-07T05:25:06+5:302023-10-07T05:27:05+5:30
या प्रकरणी १२ जणांना गजाआड करण्यात आले.
मुंबई : नाशिकच्या एमआयडीसी परिसरात एमडी हा अमली पदार्थ बनविणारी फॅक्टरी साकीनाका पोलिसांनी उद्ध्वस्त करत सव्वातीनशे कोटी रुपये किमतीचे १५१ किलो एमडी हस्तगत केले आहे. तसेच या प्रकरणी १२ जणांना गजाआड करण्यात आले.
८ ऑगस्ट रोजी साकीनाका पोलिस ठाण्यातील आदित्य जाधव (वय ३५) यांना ड्रग्ज विक्रीची माहिती मिळाली होती. त्यानुसार परिमंडळ १० चे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक गबाजी चिमटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून अन्वर अफसर सय्यद याला अटक केली. त्याच्याकडून १० ग्रॅम एमडीदेखील ताब्यात घेतले. हे एमडी जावेद, आसिफ, इकबालकडूनत्याने विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार तिघांनाही अटक करून एमडी साठा जप्त केला. त्यांच्या चौकशीतूनच पोलिस सुंदर, हसन आणि अयुब यांच्यापर्यंत पोहोचले. हसनच्या चौकशीत आरिफची माहिती मिळाली आणि हैदराबादमधून त्याच्याकडून ११० ग्रॅम एम.डी. जप्त केले. तो जे जे मार्ग परिसरातील नासीर उमर शेख ऊर्फ चाचाकडून अमली पदार्थ घेत असल्याने चाचालाही बेड्या ठोकण्यात आल्या. कल्याणमधून त्याचा साथीदार रिहानलाही अटक केली गेली.
ललित पाटीलला ड्रग्ज कुणी पुरवले?
पुणे : ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ७१ आणि ७४, येरवडा जेलमधील बंदी वॉर्ड क्रमांक १६ आणि बालविकास कँटीनमधील सीसीटीव्ही फुटेज गुरुवारी मिळाले. ललित याने या दोघांमार्फत आणखी कोणाला अंमली पदार्थ विकले आहेत का, अन्य कोठे साठा करून ठेवला आहे का, याचा तपास करण्यात येत आहे. त्यामुळे सुभाष जानकी मंडल व रौफ रहिम शेख यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार दोघांच्या पोलिस कोठडीत ९ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला.
...आणि कारखान्याची लिंक सापडली
आरोपींच्या चौकशीत तपास अधिकाऱ्यांना नाशिकच्या जिशान इकबाल शेख (३४)ची लिंक सापडली.
तसेच तो नाशिक रोडच्या एमआयडीसीत एमडी तयार करणारा कारखाना चालवत असल्याचेही समजले. त्यानुसार पथकाने छापा टाकत १३३ किलो वजनाचे एम डी हस्तगत केले.
त्यानुसार एकूण १५१ किलो ३०५ ग्रॅम वजनाच्या आणि ३०० कोटी २६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
ड्रग माफिया ललित पाटील याचा भाऊ हा कारखाना चालवत असल्याचे सांगितले जात आहे.