Join us

लंडनहून आलेल्या ३२९ प्रवाशांचे विमानतळावर स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 5:57 PM

परदेशात अडकलेल्या भारतीयांचा पहिला गट रविवारी पहाटे मुंबईत दाखल

 

मुंबई : लंडनहून एअर इंडियाच्या एआय 130 या विशेष विमानाने रविवारी पहाटे दीड वाजता 329 प्रवाशांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर या प्रवाशांचे स्वागत करुन त्यांना विमानतळ प्रशासनाद्वारे आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात आल्या. 

या 329 प्रवाशांमध्ये पुणे येथील 65, अमरावती, अकोला, औरंगाबाद, बीड, गोवा व गोंदिया येथील व मुंबईतील 248 प्रवासी यांचा समावेश होता. मुंबईतील प्रवाशांना विविध हॉटेलमध्ये कॉरन्टाईन करण्यात आले.  या सर्व प्रवाशांनी ( दोन तीन जणांचा अपवाद वगळता)  आरोग्य सेतू अँप डाऊनलोड केले. या प्रवाशांना त्यांच्या विहित स्थळी पोचवण्यासाठी मुंबईत बेस्ट बस व मुंबई बाहेर एसटी बसची व्यवस्था करण्यात आली. विमानतळावर प्रमाणित पध्दतीद्वारे प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात आहे.  जगभरात विविध देशांत अडकलेल्या 14 हजार 800 भारतीयांना भारतात हवाई मार्ग आणले जात आहे  यापैकी 2 हजार 350 भारतीय प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 10 विमानांद्वारे उतरणार आहेत. या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विमानतळ प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत.  

लंडन, अमेरिका, सिंगापूर,मलेशिया,बांगलादेश, फिलीपाईन्स यासह विविध देशांत अडकलेल्या भारतीयांना या विशेष विमानांनी भारतात आणले जात आहे. विमानतळावर यासाठी दोन स्वतंत्र एरोब्रिज तयार करण्यात आले असून वैद्यकीय प्रक्रियेद्वारे प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग व तपासणी केली जात असून त्यानंतर त्यांना इमिग्रेशन विभागात प्रवेश दिला जातो.  प्रत्येक प्रवाशाला किमान दोन मीटर अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आहे.  फेस मास्क परिधान करणे व सँनिटायझर्सचा वापर करणे या प्रवाशांना बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवाशांना विमानतळावरुन लवकर बाहेर पडता येणे शक्य व्हावे यासाठी 30 इमिग्रेशन काउंटर सुरु करण्यात आले आहेत. प्रवाशांचे सामान विमानतळावर निर्जंतुकीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवाशांना राज्य सरकार च्या प्रशासनाकडे सुपूर्द करेपर्यंत सीआयएसएफ जवान त्यांना सोबत करत आहेत. 

कोरोनाची लक्षणे नसलेल्या मुंबईतील प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार मुंबईत विविध हॉटेलमध्ये कॉरन्टाईन करण्यात येत आहे. तर मुंबई बाहेरील प्रवाशांना त्यांच्या जिल्ह्याच्या मुख्यालयात पोचवण्याची व्यवस्था राज्य सरकारने केली आहे. त्यासाठी विमानतळावर मदत कक्ष तयार करण्यात आला आहे.  दिवसभरात एअर इंडियाच्या तीन विमानांनी प्रवाशांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. पहाटे दीड वाजता लंडनहून आलेल्या विमानातून 329 प्रवासी, सिंंगापूर येथून आलेल्या विमानातून 243 प्रवासी व रात्री 11 वाजता मनिला येथून आलेल्या विमानातून 241 प्रवाशांचे  आगमन झाले.  सोमवारी पहाटे पावणे पाच वाजता सँन फ्रान्सिस्को व सायंकाळी साडेसहा वाजता ढाका येथून विमानातून प्रवासी येणार आहेत. 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई