मुंबई - आज १.१० कि.मी. चा भुयारीकरणाचा ३२वा टप्पा मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशन (एम.एम.आर.सी.) तर्फे पूर्ण करण्यात आला. हे भुयारीकरण सिद्धिविनायक उत्तर शाफ्ट ते दादर मेट्रो स्थानक इतके आहे . या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी उपस्थित होते .
नागरिकांना कामामुळे होणारा त्रास कसा कमी होईल याचा विचार करून हे महत्वपूर्ण आणि अवघड काम पूर्ण करणं कौतुकास्पद आहे. यामुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतुक सुविधेमध्ये सकारात्मक बदल होणार असून हे एक वरदान ठरणार आहे, असं कुंभकोणी म्हणाले. कृष्णा २ हे हेरेननेच बनावटीचे आणि भूगर्भदाब नियंत्रण तंत्रज्ञानाचा समावेश असलेले टनेल बोअरिंग मशीन १६ डिसेंबर २०१९ रोजी भूगर्भात सोडण्यात आले होते. या मशीनने आज २९५ दिवसात ७९१ रिंगच्या सहाय्याने अप-लाईन भुयारीकरण पूर्ण केले.दादर मेट्रो स्थानक रहिवासी इमारती आणि व्यापारी आस्थापने यांच्यामध्ये बांधण्यात आले असून मुंबई मेट्रो ३च्या स्थानकांपैकी एक महत्वाचे स्थानक आहे. त्यामुळे आजचा भुयारीकरणाचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करणं हे आव्हानात्मक होते, असं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन चे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल म्हणाले.
पॅकेज ४ मध्ये दादर सिद्धिविनायक आणि शितलादेवी या स्थानकांचा समावेश असून दादर स्थानकाचे ६१% काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत एकूण ९४ % भुयारीकरण आणि ९५ % खोदकाम पूर्ण झाले आहे . संपूर्ण प्रकल्पाचा विचार करता ८७ % भुयारीकरण आणि ६० % बांधकाम पूर्ण झाले आहे.