अमेरिकी महिलेला ३३ कोटींचा गंडा; सीबीआयकडून गुन्हा दाखल, दिल्ली, लखनौमध्ये छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 07:10 AM2023-07-08T07:10:08+5:302023-07-08T07:10:20+5:30
सायबर विश्वातील ही एक नवी कार्यपद्धती या निमित्ताने उजेडात आली आहे.
मुंबई/दिल्ली : तुमच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर जो दूरध्वनी क्रमांक आला आहे त्यावर कृपया संपर्क करा. तुमच्या निवृत्तीच्या पैशांसदर्भात बँकेला काही माहिती हवी आहे, असे सांगत एका ज्येष्ठ अमेरिकी महिलेला पाच भारतीय हॅकर्सनी तब्बल चार लाख अमेरिकी डॉलर्सना (३३ कोटी रुपये) गंडा घातला आहे. या प्रकरणी सीबीआयने पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी दिल्ली, लखनौ, कानपूर येथे छापेमारी केली आहे.
सायबर विश्वातील ही एक नवी कार्यपद्धती या निमित्ताने उजेडात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा या महिलेला तिच्यासमोर आलेल्या मेसेजच्या अनुषंगाने त्या क्रमांकावर संपर्क केला त्यावेळी आपण एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला असून तुमच्या बँक खात्यात काही पैशांचे व्यवहार होत आहेत. ते ऑनलाइन पेमेंट आमच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून होते. मात्र, काही तांत्रिक समस्या निर्माण झाली असून आम्ही आमच्या पातळीवरून त्या समस्येचे निराकरण करत असल्याचे सांगत या हॅकर्सनी थेट त्या महिलेच्या लॅपटॉपचा व्हर्च्युअल ताबा मिळवला. त्यानंतर तिच्याच नावाने एक क्रिप्टो करन्सी खाते तयार करत तिच्या बँक खात्यातील पैसे या क्रिप्टो करन्सी खात्यात वळवले. हे पैसे क्रिप्टो खात्यात वळल्यानंतर या पाच हॅकर्सनी ते वाटून घेतले.
लॅपटॉप, मोबाइल फोन जप्त
आपल्या बँक खात्यातील पैसे गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने थेट सीबीआयकडे तक्रार केली. या प्रकरणी सीबीआयने प्रफुल गुप्ता, रिशभ गुप्ता, सरिता गुप्ता, कुनाल अल्मेडी, गौरव पहावा या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, या आरोपींशी निगडीत ठिकाणी छापेमारी करत लॅपटॉप, मोबाइल फोन जप्त केले आहेत.