Join us

मुनगंटीवार चांगलेच भडकले, सयाजी शिंदेंच्या प्रश्नावर दिलं उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 10:45 AM

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार केला, त्यावर टीका करत सयाजी शिंदे म्हणाले की,

मुंबई - महाराष्ट्रातील वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हे केवळ नाटक आहे. 33 कोटींची वृक्ष लागवड हे थोतांड आहे. या वृक्ष लागवडीवरुन भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जातं. त्याच त्याच खड्ड्यात वृक्ष लागवड केली जाते असा आरोप अभिनेता सयाजी शिंदे यांनी सरकारवर केला होता. शिंदेंच्या या आरोपाला उत्तर देताना, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी वृक्षलागवड हा सरकारचा उपक्रम नसून स्वयंप्रेरणेनं आणि स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून सुरू झालेली चळवळ असल्याचं मुनगंटीवर यांनी स्पष्ट केलं आहे.  

महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे थोतांड; अभिनेता सयाजी शिंदेंनी सरकारवर केला गंभीर आरोप 

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार केला, त्यावर टीका करत सयाजी शिंदे म्हणाले की, मोजक्याच ग्रामपंचायती झाडं लावण्याचा उपक्रम करतात. 3 हजार 300 झाडे किती ग्रामपंचायतीने लावलेत? 33 कोटी वृक्ष लावल्यावर जपणार कुठे? पाणी आणणार कुठून? दरवर्षी लावलेल्या झाडांचे, त्याला जगविण्यासाठी आलेल्या खर्चाचा हिशोब द्यावा अशी मागणी त्यांनी राज्य सरकारला केली. तसेच वृक्षांमध्ये 250 जाती आहेत. नगरपालिका शाळांच्या प्रत्येक अंगणात गुलमोहर, उंच झाडे दिसतील. दरवर्षी त्याच खड्ड्यात जाऊन झाडं लावली जातात. मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना वृक्षांच्या जातीची माहिती नाही. कोणतं झाड लावलं पाहिजे याची माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे केवळ नाटक आहे. असा संताप अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला होता. त्यावर, सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

सयाजी शिंदेंचा आरोप म्हणजे अज्ञान आणि माहितीचा अभाव असून 33 कोटी वृक्षलागवड ही सरकारी योजना नाही, तर आंदोलन असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटलंय. वृक्षलागवड हे केवळ वनविभागाचे कार्य नसून स्थानिक गाव व जिल्हापातळीवरील अनेक संस्था संघटनांचा यामध्ये सहभाग आहे. त्यासाठी, समित्याही गठीत करण्यात आल्या आहेत. तसेच, सरकारच्या नर्सरीमध्ये 156 प्रकारच्या प्रजातींचे वृक्ष आहेत. राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींना ही यादी आणि वृक्षांची रोपे पुरविण्यात आलेली आहेत, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. विशेष म्हणजे महाराष्ट्राचा आदर्श घेऊनच देशात 125 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. तर, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनेही आपल्या उपक्रमाची नोंद घेतल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.    

टॅग्स :सुधीर मुनगंटीवारवनविभागसरकार