एफडीएने जप्त केले ३३ लाखांचे भेसळयुक्त पदार्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 01:12 AM2018-11-02T01:12:32+5:302018-11-02T01:12:42+5:30
सणासुदीत कडक कारवाई : १९ हजार किलो खाद्यपदार्थ जप्त
मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यात भेसळीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. राज्यात दिवाळी व इतर सणानिमित्त भेसळयुक्त बर्फी, खवा-मावा, तेल-तूप या खाद्यपदार्थांच्या दुकानांवर छापा मारून ते जप्त करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या या कारवाईत राज्यभरातून १९ हजार ४३५ किलो खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याची किंमत ३३ लाख ५५ हजार ६०० रुपये एवढी आहे. या कारवायांदरम्यान एफडीएने २९७ अन्न नमुने तपासणीसाठी पाठविले असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
राज्यात आतापर्यंत १७ हजार ५५२ किलोचा सुमारे ३१ लाख रुपये किमतीचा भेसळयुक्त खवा-मावा जप्त करण्यात आला आहे. तसेच यादरम्यान १ हजार ८४८ किलो सुमारे १ लाख ६७ हजार रुपये किमतीचे भेसळयुक्त वनस्पती तूप, खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. तसेच भेसळयुक्त मिठाई ४६ हजार ९७६ कि.ग्रॅ. ज्याची किंमत सुमारे ३७ लाख ७७ हजार ९५ रुपये आहे ती जप्त करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने अहमदाबाद-गुजरात येथून प्रवासी वाहनातून स्पेशल बर्फी हा अनियंत्रित तापमानामध्ये साठा करून आरोग्यास घातक अशा परिस्थितीमध्ये साधारण २४ तासांपेक्षा जास्त कालावधीत वाहतूक केलेला होता. यावर कारवाई करून एकूण १९ हजार ४३५ किलोग्रॅम असा जवळजवळ ३३ लाख ५५ हजार ६०० रुपये एवढ्या किमतीचा एकूण माल जप्त करण्यात आला आहे. अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित साठा जीवाणू व विषाणूचा संसर्ग होण्याच्या शक्यतेमुळे नष्ट करण्यात आला आहे भेसळयुक्त पदार्थाच्या माहितीसाठी अन्न व औषध प्रशासनाने १८00२२२३६५ हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला असून नागरिकांना या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे़