Join us

नालेसफाईत अडथळा ठरणाऱ्या ३३ झोपड्या हटविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 2:05 AM

कारवाईमध्ये महापालिकेचे ३० कामगार, कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते.

एम पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १३४ मध्ये गोवंडी-मानखुर्द येथील आदर्शनगर नाला आहे. या नाल्याशेजारी झोपडी स्वरूपातील अतिक्रमणे निर्माण झाल्याने, नाल्याच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यास अडथळा येत होता. अतिक्रमणांमुळे नालेसफाई विषयक कार्यवाही करण्यातही अडथळा येत होता. या अनुषंगाने पोलिसांच्या सहकार्याने सोमवारी करण्यात आलेल्या कारवाईच्या दरम्यान ३३ अनधिकृत झोपड्या पाडण्यात आल्या. यामुळे नालेसफाईचे काम वेळेत पूर्ण होण्यासह नाल्याच्या संरक्षक भिंतीचे बांधकामही अधिक वेगाने पूर्ण करण्यास मदत होणार आहे, अशी माहिती एम पूर्व विभागाचे सहायक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली. कारवाईमध्ये महापालिकेचे ३० कामगार, कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते. कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्याचे २७ पोलीस कर्मचारी, अधिकारी यांचा ताफाही घटनास्थळी तैनात होता. कारवाई दरम्यान १ जेसीबी, १ डम्पर यासह इतर आवश्यक वाहने व साधनसामग्रीदेखील वापरण्यात आली. झोपड्या हटल्याने नालेसफाई सुरू होईल.