लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबईत दाटीवाटीने असणाऱ्या वस्त्यांमध्ये, तसेच टोलेजंग इमारतींमध्येही मागील काही वर्षांपासून आगीच्या घटना वाढल्या आहेत. कुठे सिलिंडर स्फोट, स्टोव्हचा भडका, सदोष वायरिंग, निष्काळजीपणा आगीला कारणीभूत ठरत आहेत. २०१६-१७ ते २०२२-२३ या सात वर्षांत शहरात लहान-मोठ्या ३३ हजार ३१३ आर्गीच्या घटना घडल्या आहेत. त्यात २२१ जणांचा मृत्यू, तर एक हजार ४९३ जण जखमी झाले.
सदोष वायरिंगमुळे शॉर्टसर्किट आणि निष्काळजीमुळे लागलेल्या आगीच्या घटना अधिक आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेकदा अग्निशमन नियमावलींचे पालन होत नाही.
वर्षानुवर्षे घरातील किंवा इमारतीतील जुनी झालेली वायरिंग बदलण्यात येत नाही. वीजवापराचा अतिरिक्त भार आल्यामुळेही आगीच्या घटना अधिक घडत असल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली.
शॉर्टसर्किट हेच कारण अनेक इमारतींमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा असते. मात्र, त्याची देखभाल- दुरुस्ती होत नाही. अनेकदा या यंत्रणेचा वापर नेमका कसा करतात, याची नसते. काही इमारतींमध्ये तर अग्निशमन यंत्रणाही नसते. परिणामी, अग्निशमन दलावरच अवलंबून राहावे लागते. झोपड्या, चाळींमध्ये किंवा अनधिकृत इमारतींमध्येही वायरिंगचे जाळे विचित्र पद्धतीने पसरलेले असते. त्यामुळे शॉर्टसर्किट झाल्यास आगीच्या घटनांना सामोरे जावे लागते.