एमडी, डिप्लोमा पॅथॉलॉजीच्या ३ वर्षांत ३३ जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2016 01:48 AM2016-07-15T01:48:07+5:302016-07-15T01:48:07+5:30
बोगस पॅथॉलॉजी लॅबमधून सुरू असलेल्या निदानाच्या काळ्या बाजारामुळे रुग्णांच्या जिवाशी खुलेआमपणे राज्यात खेळ सुरू आहे. तथापि, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे हा विळखा अधिक घट्ट होत आहे
पूजा दामले, मुंबई
बोगस पॅथॉलॉजी लॅबमधून सुरू असलेल्या निदानाच्या काळ्या बाजारामुळे रुग्णांच्या जिवाशी खुलेआमपणे राज्यात खेळ सुरू आहे. तथापि, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे हा विळखा अधिक घट्ट होत आहे. याचा परिणाम पदव्युत्तर अभ्यासक्रमावरही झाल्याचे दिसून येत आहे. २०१३ ते २०१५ या तीन वर्षांत पॅथॉलॉजीच्या पदव्युत्तर (एमडी, डिप्लोमा) अभ्यासक्रमाच्या ३३ जागा रिक्त राहिल्याचे समोर आले आहे. निदानाच्या काळ्या बाजारामुळे पॅथॉलॉजीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाकडे डॉक्टर पाठ फिरवत असल्याचेही यामुळे समोर आले आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत राज्यातील एकूण २८ वैद्यकीय महाविद्यालये येतात. या वैद्यकीय महाविद्यालयांत पॅथॉलॉजीच्या एकूण ४६४ जागा आहेत. त्यापैकी ३९८ जागा या एमडी अभ्यासक्रमासाठी तर ६६ जागा या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी गेल्या तीन वर्षांपासून पसंती घटत असल्याचे दिसून येत आहे. ताप, जास्त काळापासून असलेला खोकला, दीर्घकाळचे दुखणे आदी कारणांसाठी डॉक्टर रक्त, मूत्र, बॉडी फ्युएडच्या तपासणी करण्याचे सांगतात. तपासणी अहवालावरून आजाराचे निदान करून औषधोपचार सुरू केले जातात, म्हणूनच आरोग्य क्षेत्रात पॅथॉलॉजी शाखा महत्त्वाची मानली जाते.
पॅथॉलॉजी विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला डॉक्टरच स्वतंत्रपणे पॅथॉलॉजी लॅब चालवू शकतो. पण शहरांसह गावातही प्रशिक्षित नसलेल्या व्यक्ती, दहावी-बारावी शिकलेल्या व्यक्ती स्वतंत्रपणे पॅथॉलॉजी लॅब चालवत आहेत. याचा फटका या अभ्यासक्रमांना बसत आहे. या वेगाने पॅथॉलॉजीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहिल्यास पुढच्या काळात पॅथॉलॉजिस्टची संख्या झपाट्याने कमी होईल.
पुढील १० वर्षांत आतापेक्षाही पॅथॉलॉजिस्ट कमी होतील. शासनाने बोगस पॅथॉलॉजी लॅबच्या वाढत्या संख्येवर आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. गेल्या १० वर्षांत लढा सुरू असूनही या बोगस पॅथॉलॉजी फोफावत असल्याचे मत महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी मांडले.