भेंडी बाजार इमारत दुर्घटनेत 33 जणांचा मृत्यू, 27 तासांनंतर एनडीआरएफनं थांबवलं बचावकार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 12:11 PM2017-09-01T12:11:24+5:302017-09-01T12:32:21+5:30
मुसळधार पावसाच्या तडाख्यानंतर गुरुवारी (31 ऑगस्ट) मुंबईतील भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील 117 वर्षे जुनी सहा मजली हुसैनी इमारत सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत 33 जणांना जीव गमवावा लागला. तर 15 जण जखमी झालेत.
मुंबई, दि. 1 - मुसळधार पावसाच्या तडाख्यानंतर गुरुवारी (31 ऑगस्ट) मुंबईतील भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील 117 वर्षे जुनी सहा मजली हुसैनी इमारत सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत 33 जणांना जीव गमवावा लागला असून 15 जण जखमी झालेत. तर 46 जणांना ढिगा-यातून सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आले आहे. मृतांमध्ये 24 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी एनडीआरएफकडून बचावकार्य थांबवण्यात आले आहे. रात्रभर हेबचावकार्य सुरु होते. सकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती एनडीआरएफनं दिली. या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नसून दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
इमारतीत तळ मजल्यावर लहान मुलांची नर्सरी शाळा, पहिल्या मजल्यावर चार खोल्या तर इतर माळ्यांवर प्रत्येकी एक प्रमाणे एकूण दहा खोल्या होत्या. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीत नऊ कुटुंब राहत असून, ६० ते ७० लोक होते. इमारत दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव शेजारच्या दोन इमारतींमधील कुटुंबांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद पथकाचे जवान आणि अन्य यंत्रणेने जिकिरीचे प्रयत्न करीत जखमींना सुखरूप बाहेर काढले. म्हाडाने २०११मध्येच ही इमारत धोकादायक घोषित केली होती. त्यानंतर ‘सैफी बु-हाणी अपलिफमेंट ट्रस्ट रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट’मध्ये होती. २०१६मध्ये इमारत पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र रहिवाशांनी घराबाहेर पडण्यास नकार दिला होता.
#WATCH#MumbaiBuildingCollapse: Operations continue in Bhendi Bazar; 13 rescued safely, 31 deaths in the incident so far. pic.twitter.com/IXwnS0lQXL
— ANI (@ANI) September 1, 2017
#MumbaiBuildingCollapse: Overnight ops continued in Bhendi Bazar; 13 rescued safely, 31 deaths in the incident says NDRF Asst Commandant pic.twitter.com/YijXSBglJA
— ANI (@ANI) September 1, 2017
लहान मुले बचावली, इमारत कोसळली
त्या वेळी इमारतीमधील नर्सरी सुरू असती, तर असंख्य लहान मुले बळी पडली असती, अशी भीती येथील स्थानिक रहिवाशांनी वर्तवली.
धोकादायक इमारती सक्तीने रिकाम्या करणार
इमारत कोसळल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. धोकादायक इमारतीत राहणाºया लोकांना जबरदस्तीने बाहेर काढले जाईल. आता सरकार थांबणार नाही. आठवड्याभरात ही कारवाई करण्यात येईल, असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी माध्यमांना सांगितले.
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर
सकाळी महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, मुंबई शहरचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनीही घटनास्थळी भेट दिली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले. तसेच जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी सूचना दिल्या. मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. दक्षिण मुंबईतील अनेक इमारती धोकादायक असून, त्यांच्या पुनर्विकासातूनच हा प्रश्न सुटू शकतो. सरकार यासाठी प्रयत्नशील आहे, असे सुभाष देसाई म्हणाले.
दाऊदची इमारत शेजारीच
हुसैनी इमारतीच्या शेजारीच कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहीम याची इमारत आहे. या इमारतीमध्ये त्याचा भाऊ इक्बाल कासकर राहतो. दुर्घटना घडली तेव्हा तो घरातच होता. मोठा आवाज झाल्याने तो बाहेर आला. या दुर्घटनेमुळे आमच्या इमारतीलाही हादरा बसल्याचे त्याने माध्यमांना सांगितले.
‘मेहता यांनी राजीनामा द्यावा’
राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे ही दुर्घटना घडल्याने नैतिकतेच्या आधारे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्टÑवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.