मुंबई : मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत देण्यात येणाऱ्या २५ टक्के जागांवरील (आरटीई) प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेदरम्यान पालकांनी अर्जात बनवाबनवी केल्याचे प्रकार समोर आले आहेत. मुंबईत विभागातून दाखल झालेल्या एकूण १४,१३९ अर्जांमध्ये ३३० बनावट अर्जांची नोंद झाली असून ते सिस्टीममधून डिलीट केल्याची माहिती आरटीई प्रवेशप्रक्रिया समन्वयकांनी दिली. कोणत्याही एका अर्जातून नंबर लागावा आणि आपल्याला हवी ती शाळा मिळावी यासाठी चुकीच्या पद्धतीने नोंदणी करत पालकांनी २ ते ३ वेळा अर्ज नोंदणी केल्याचे समोर आले आहे.
आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज नोंदणी करण्याची मुदत ४ मार्च रोजी संपुष्टात आली असून, यंदा उपलब्ध जागांपेक्षा दुपटीने नोंदणी झाली. मात्र यंदाची सोडत छाननी प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच सोडतीचे नवीन वेळापत्रक शिक्षण विभागाकडून जाहीर होईल, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आलेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असून त्यामधील एकाच पालकाने आपल्या पाल्याचे दोन किंवा त्याहून अधिक अर्ज भरले असल्यास ते बाद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये मुंबई विभागातून एकूण ३३० अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामध्ये एकाच मुलाचे नाव बदलून अर्ज भरणे, पत्ता बदलणे, शाळेच्या नावात बदल करणे, स्वत:चे घर असताही भाडेकरू म्हणून दाखवणे आदी प्रकार समोर आले.नवीन वेळापत्रकाची प्रतीक्षायंदा प्रवेशप्रक्रियेत बदल म्हणून एकच सोडत काढण्यात येईल. त्यानुसार शाळेत आरटीईअंतर्गत उपलब्ध जागांएवढीच प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे. सोडत लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात येईल. या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर पहिल्या प्रतीक्षा यादीतील अनुक्रमे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचा मेसेज एनआयसीद्वारे पाठविण्यात येईल. त्यांना अलॉटमेंट लेटर काढून विहित मुदतीत प्रवेश घ्यावा लागेल. यानंतरही शाळेत जागा रिक्त रहिल्यास दुसºया प्रतीक्षा यादीतील अनुक्रमाने प्रवेश देण्यात येईल. तिसºया आणि चौथ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनाही असेच प्रवेश देण्यात येतील. त्यामुळे सोडतीच्या नवीन वेळापत्रकाची पालकांना प्रतीक्षा आहे.