मुंबई: पश्चिम रेल्वेवर गुरुवारी १७ वातानुकूलित (एसी) लोकल सेवा रद्द करून त्याऐवजी नॉन-एसी सेवा चालविण्यात आल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात पश्चिम रेल्वेच्या या भोंगळ कारभाराचा फटका एसी लोकलच्या प्रवाशांना बसला. यामुळे नियमित एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड उकाडा आणि अस्वस्थता सहन करावी लागली आहे. शुक्रवारी आणखी १७ सेवा नॉन-एसी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण असून रेल्वे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सध्या ८ एसी लोकल गाड्या आहेत, त्यापैकी ७ गाड्या नियमितपणे सेवेत असतात. प्रत्येक एसी लोकलद्वारे दिवसभरात १५ ते १७ सेवा चालवल्या जातात. यानुसार, पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज सरासरी १०९ एसी सेवा उपलब्ध असतात. मात्र, गुरुवारी एका एसी गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने ती देखभाल - दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये पाठवण्यात आली. याचा थेट परिणाम एसी सेवांच्या उपलब्धतेवर झाला. परिणामी, प्रशासनाला नाईलाजाने या सेवा नॉन-एसी गाड्यांद्वारे चालवाव्या लागल्या. गुरुवारी चर्चगेट ते बोरिवली,भायंदर आणि विरार दरम्यानच्या प्रवाशांना या समस्येचा सामना करावा लागला. एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उष्ण हवामानात नॉन-एसी गाड्यांमधून प्रवास करताना प्रवाशांना प्रचंड त्रास झाला.
मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांवर एसी लोकल गाड्यांना मागणी वाढत आहे. विशेषतः उन्हाळ्यात वातानुकूलित गाड्यांचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, प्रशासनाकडे पुरेशा एसी गाड्या उपलब्ध नसल्याने ही मागणी पूर्ण होताना दिसत नाही. याशिवाय, गर्दीच्या वेळी अनेक स्टेशनांवर एसी लोकलमध्ये जादा प्रवाशांमुळे दरवाजे बंद न होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशा परिस्थितीत एसी सेवांमध्ये वाढ करण्याची गरज असताना, उलट उपलब्ध गाड्यांमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांचा त्रास वाढला आहे.
एसी लोकलच्या पास आणि तिकिटांचे शुल्क देऊनही नॉन-एसी गाड्यांमधून प्रवास करावा लागत असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. “आम्ही एसीसाठी पैसे भरतो, पण मिळते काय? उकाडा आणि घाम,” अशी तक्रार एका नियमित प्रवाशाने केली. दुसऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, “गर्दीच्या वेळी नॉन-एसी गाडीत श्वास घेणेही कठीण होते. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करायला हव्यात.” प्रवाशांनी एसी गाड्यांची संख्या वाढवणे, तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी नियमित देखभाल आणि पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.