विवा समूहाची ३४ कोटींची मालमत्ता जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:07 AM2021-02-09T04:07:50+5:302021-02-09T04:07:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई नालासोपारा : पीएमसी बँकेच्या हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी वसई-विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर व भाई ठाकूर यांच्यावर ...

34 crore assets of Viva Group confiscated | विवा समूहाची ३४ कोटींची मालमत्ता जप्त

विवा समूहाची ३४ कोटींची मालमत्ता जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई नालासोपारा : पीएमसी बँकेच्या हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी वसई-विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर व भाई ठाकूर यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) वक्रदृष्टी कायम राहिली आहे. त्यांच्या विवा समूहाची ३४ कोटी ३६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामध्ये मुंबई, ठाणे व विरारमधील फ्लॅट, कार्यालये, फार्महाऊस, आदींचा समावेश आहे. जयेंद्र ऊर्फ भाई ठाकूर आणि त्यांचे भाऊ आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मालकीच्या मालमत्ता आहेत. दरम्यान, या प्रकरणी ठाकूर बंधूंना लवकरच चौकशीसाठी पाचारण केले जाणार असल्याचे ईडीतील सूत्राकडून सांगण्यात आले.

पीएमसी बँकेतून बेकायदेशीरपणे कर्ज घेऊन त्याचा गैरवापर केल्याप्रकरणी ईडीने अनेक उद्योगसमूहावर मनी लॉन्ड्रिंग अंर्तगत गुन्हे दाखल केले आहेत. त्यानुसार गेल्या महिन्यात विवा समूहाची कार्यालये; तसेच ठाकूर बंधूंच्या घरांवर छापे टाकले होते. व्यवस्थापकीय संचालक मेहुल ठाकूर व संचालक मदन चतुर्वेदी यांना २३ जानेवारीला अटक केली होती.

छाप्यांदरम्यान हाती आलेल्या माहितीच्या आधारे ठाकूर यांची अंधेरीतील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीतील सूत्रांनुसार, अंधेरी पूर्वेतील कॅलेडोनिया इमारतीतील मालमत्ता मॅक स्टार या कंपनीने बांधली आहे. मॅक स्टार ही हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची (एचडीआयएल) उपकंपनी आहे. एचडीआयएल ही पीएमसी बँक गैरव्यवहारातील सर्वांत मोठी कर्जबुडवी कंपनी आहे. एचडीआयएल, मॅक स्टार व विवा समूह यांच्यात संगनमत असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.

कागदाेपत्री किंमत ३४ लाखच दाखविली

जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये दाेन कार्यालयांचा समावेश असून, कागदोपत्री या दोन मालमत्तांची किंमत ३४ लाख ३६ हजार इतकीच दाखविण्यात आली आहे. त्यापोटी विवा समूहाने मॅक स्टारला ३७ चेक दिल्याचे तपासात आढळले आहे. राकेश वाधवान यांनी एचडीआयएल कंपनीमार्फत विवा समूहाचे संचालक मेहुल ठाकूर यांना मोठ्या प्रमाणात निधी वळविला. एचडीआयएलने येस बँकेचे कर्जही बुडविले आहे.

Web Title: 34 crore assets of Viva Group confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.