छोटा राजनवर चालणार 34 वर्षापूर्वीच्या जॉन परेराच्या खुनाचा खटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:06 PM2017-07-19T14:06:10+5:302017-07-19T14:37:26+5:30

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन विरुद्ध 34 वर्षांपूर्वीच्या खूनाचा खटला पुढच्या आठवडयापासून चालू होणार आहे.

34 year old John Pereira murder case | छोटा राजनवर चालणार 34 वर्षापूर्वीच्या जॉन परेराच्या खुनाचा खटला

छोटा राजनवर चालणार 34 वर्षापूर्वीच्या जॉन परेराच्या खुनाचा खटला

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 19 - अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन विरुद्ध 34 वर्षांपूर्वीच्या खूनाचा खटला पुढच्या आठवडयापासून चालू होणार आहे. तो अंडरवर्ल्डमध्ये छोटा राजनच्या उदयाचा काळ होता. फेब्रुवारी 1983 मध्ये छोटा राजनने मुंबईत स्मगलर जॉन परेराची हत्या केली होती.  मासेमारीच्या व्यवसायातून स्मगलर बनलेल्या जॉन परेराची राजनने हत्या केली होती. छोटा राजन विरुद्ध प्रलंबित असलेल्या जुन्या प्रकरणांपैकी हा एक खटला आहे. 
 
नोव्हेंबर 2015 मध्ये छोटा राजनला इंडोनेशियातील एका रिसॉर्टमधून अटक झाल्यानंतर त्याला प्रत्यार्पण करारानुसार भारताच्या ताब्यात सोपवण्यात आले. छोटा राजन सध्या तिहार तुरुंगात बंद असून  विविध गुन्ह्यांच्या प्रकरणात त्याच्या विरुद्ध खटले सुरु आहेत. प्रत्यार्पण झाल्यापासून राजन विरोधातील सर्व प्रकरणांचा तपास सीबीआय करत आहे. पुढल्या आठवडयापासून या खटल्याची सुनावणी सुरु होणार असून, राजनच्या वकिलांनी अभ्यास करण्यासाठी वेळ मागितला आहे. 
 
आणखी वाचा 
 
स्मगलिंगमधल्या वादातून राजनने फेब्रुवारी 1983 मध्ये जॉन परेराची हत्या केली होती. परेरा 21 फेब्रुवारीच्या सकाळी मुलगी हेलन आणि दोन वर्षाच्या मुलासोबत जुहू बीचवर मॉर्निंग वॉकला गेला असताना त्याची हत्या करण्यात आली होती. 3 मार्च 1983 रोजी या हत्येप्रकरणी छोटा राजनला अटक झाली होती. पण नंतर राजन फरार झाला. हत्येच्यावेळी छोटा राजन राजन नायर ऊर्फ बडा राजनसाठी काम करायचा. त्यावेळी छोटा राजन हे नाव मुंबईच्या गुन्हेगारी जगतात फारसे प्रसिद्ध नव्हते. हे अत्यंत जुने प्रकरण असल्यामुळे कोर्टाच्या जुन्या नोंदी मिळवण्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत. 

बनावट पासपोर्ट प्रकरणी छोटा राजन दोषी
अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन याच्यासह आणखी तिघांना बनावट पासपोर्ट प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सोमवारी दोषी ठरविले आहे. गेल्यावर्षी 8 जूनला सीबीआयने छोटा राजन याच्यासह पासपोर्ट अधिकारी जयश्री दत्तात्रय रहाटे, दीपक नटवरलाल शहा आणि ललिता लक्ष्मणन यांच्याविरोधात गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचणे, फसवणूक, खोटी कागदपत्रे बनविणे, असा आरोप केला. तसेच, 1998-99 च्या दरम्यान बंगळुरुमध्ये छोटा राजन याने मोहन कुमार या नावाने बनावट पासपोर्ट दाखल केला होता. यावेळी  रहाटे, शहा आणि लक्ष्मणन यांनी त्याकडे डोळेझाक केल्याचे सीबीआयने आपल्या आरोपत्रात म्हटले आहे.
 

Web Title: 34 year old John Pereira murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.