निर्बंध उल्लंघनाचे ३४ हजारांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 06:49 AM2020-04-11T06:49:15+5:302020-04-11T06:49:27+5:30
राज्यभर धरपकड सुरू : मुंबईत १९३० गुन्हे दाखल; अफवा पसरविल्याच्या १६१ तक्रारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू केलेल्या लॉकडाउनच्या काळात प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांची धरपकड सुरू असताना राज्यात दोन दिवसांत तब्बल साडेसहा हजार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे २२ मार्चपासून शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत तब्बल ३४ हजार १० गुन्हे नोंद झाले आहेत. यात, १८ हजार ९९५ वाहने जप्त करत १ कोटी २१ लाख ९९ हजार रुपयांचा दंड आकारला आहे. तर अफवा पसरविल्याप्रकरणी राज्यात १६१ गुन्ह्यांची नोंद केली आहे.
यात पुण्याची आघाडी कायम असून तिथे ४ हजार ३१७ गुन्हे दाखल आहेत. त्यापाठोपाठ नागपूर, सोलापूरचा क्रमांक लागतो. याच काळात राज्यभरात ४६८ व्यक्तींनी ‘होम क्वारंटाइन’च्या आदेशाची पायमल्ली केली आहे. तसेच व्हिसा नियमांचे उल्लंघन करणाºया परदेशी व्यक्तींविरोधात १५ गुन्हे नोंदवण्यात आले. सध्या जमावबंदी व संचारबंदी आदेश आहेत. अशा आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत एकूण ३४ हजार १० गुन्हे नोंदवून २५१० जणांना अटक करण्यात आली आहे. यात पुणे शहर (४३१७), सोलापूर शहर (२९९४ ), अहमदनगर (३२१५), नागपूर शहर (२२९९), पिंंपरी-चिंंचवड (२६९०) येथे सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे. तर मुंबईत १९३० गुन्हे दाखल आहेत.
कोरोनाबाबत अफवा पसरवून दहशत निर्माण करणाºया आणि या साथरोगाला धार्मिक रंग देत दोन समाजांत तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांविरुद्ध राज्याच्या सायबर विभागाने महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारपर्यंत १६१ गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलीस नियंत्रण कक्षात तक्रारीचा पाऊस सुरूच
या काळात राज्य पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कोरोनाबाबत तब्बल ६० हजार ७२७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नागपूरमधून सर्वाधिक म्हणजे १८ हजार ८६, मुंबई १६ हजार १११ कॉल्स आले आहेत. तर बुलडाणा आणि अमरावतीतून एकही कॉल आला नसल्याची नोंद आहे.