मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे चित्र दिसत आहेत. ठाण्यात आयुक्त असताना ‘मोक्का’च्या गुन्ह्यात अडकवून त्यांनी ३ कोटी ४५ लाख रुपये उकळल्याचा आरोप क्रिकेट बुकी सोनू जालान याने केला आहे. परमबीर सिंग यांची चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी त्याने केली असून मुख्यमंत्री, गृहमंत्री व पोलीस महासंचालकांना त्याबाबत निवेदन दिले आहे. तर केतन तन्ना या व्यापाऱ्याने परमबीर सिंग यांनी आपल्याकडून १ कोटी २५ लाखांची खंडणी वसूल केल्याचा आरोप केला आहे.
मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी केल्यावर परमबीर सिंग यांनी निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेला तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला १०० कोटी वसुली करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आता ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रिकेट बुकी सोनू जालान याने सिंग यांच्याबरोबर ठाणे खंडणी विरोधी पथकातील तत्कालीन अधिकारी प्रदीप शर्मा आणि राजेंद्र कोथमिरे यांच्यावरही आरोप केले आहेत. त्याबाबत पोलीस महासंचालक संजय पांडे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०१८ साली माझ्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यावेळी धमकावून ३.४५ कोटी उकळले, तर केतन तन्ना यांनी सिंग यांनी आपल्याकडून १ कोटी २५ लाख रुपये उकळले, असा आराेप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी व्हावी. याप्रकरणात आम्ही दोषी आढळलो तर आमच्यावर कारवाई करा, पण आम्हाला न्याय द्या, अशी मागणी केली आहे.
नियमबाह्य वर्तन व निरीक्षक अनुप डांगे यांना धमकविल्याप्रकरणी परमबीर सिंग यांची प्राथमिक चौकशी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यावर राज्य सरकारने सोपविली होती. मात्र सिंग यांनी त्याचे व्हाॅट्सॲप' कॉल रेकॉर्ड करून न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे पांडे यांनी या चौकशीतून बाहेर पडण्याचे सरकारला कळविले आहे.
..............................