Join us

३४५ मशालींच्या उजेडात उजळणार स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 9:23 PM

ठळक मुद्दे ‘पहिला दिवा महाराजांच्या चरणी, त्यानंतर आपल्या घरी’ ‘किल्ले रायगड’ मशालींच्या प्रकाशामध्ये उजळवण्यास सज्जमशालींच्या उजेडामध्ये महाराजांची पालखी मिरवणूक

मुंबई : दिवाळी म्हणजे रांगोळी, रोषणाई, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी. परंतु, आज ज्यांच्या शौर्यामुळे महाराष्ट्रात दिवाळीचा जल्लोष होतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि असंख्य मावळ्यांचे बलिदान यांचा विसर पडत आहे. त्यासाठीच, ‘पहिला दिवा महाराजांच्या चरणी, त्यानंतर आपल्या घरी’ असे अवाहन करत हजारो शिवभक्त दिवाळीमध्ये स्वराज्याची राजधानी ‘किल्ले रायगड’ मशालींच्या प्रकाशामध्ये उजळवण्यास सज्ज झाले आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांच्यावतीने  ‘शिवचैतन्य’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी १५ आॅक्टोबरच्या मध्यरात्री शिवराज्याभिषेक सोहळ्याला झालेल्या वर्षाइतके मशाली प्रज्वलीत करुन किल्ले रायगडचा परिसर उजळविण्यात येणार असल्याची माहिती, आयोजकांनी दिली. यंदाचे सहावे वर्ष असलेल्या या सोहळ्यादरम्यान एक व्यक्ती एक मशाल याप्रमाणे तब्बल ३४५ मशाली प्रज्वलीत करण्यात येतील. तसेच, मशालींच्या उजेडामध्ये महाराजांची पालखी मिरवणूकही निघेल. या दिमाखदार सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहणार असून सर्वांच्या एकवेळच्या जेवणाची व न्याहरीची व्यवस्था आयोजकांकडून  करण्यात येणार आहे. १५ आॅक्टोबरला रात्री ८ वाजता पालखी मिरवणूकीनंतर मशाली प्रज्वलीत करण्यात येणार असून रात्री ११ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम रंगतील. तसेच, १६ आॅक्टोबरला पहाटे गडदेवता पूजन, दिपोत्सव झाल्यानंतर गडावर फराळ वाटप कार्यक्रम होईल. या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त शिवभक्तांनी पारंपारिक वेशभूषेमध्ये उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

टॅग्स :रायगड