मुंबई : नायगाव येथील मातोश्री सहकारी गृहनिर्माण संस्था आणि १९ इतर सहकारी गृह निर्माण संस्था या संस्थांचा पुनर्वसन योजनेचा प्रस्ताव झोपडपट्टी प्राधिकरणास सादर केला आहे. इमारतींचे काम सुरू असून, भीमनगर येथील ३४५ सभासद व कुटुंबियांना घरे देण्यात येतील, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितले.यासंदर्भात सदस्य संजय कदम यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.उत्तरात वायकर म्हणाले, येथील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत ४५०४ घरांच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. भीमनगर कुटुंबियांसाठी सहा इमारती प्रस्तावित आहेत. यापैकी ३ इमारती झोपडपट्टीधारकांसाठी, एक विक्री आणि पुनर्वसन,२ इमारती विक्रीसाठी असून त्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.वायकर म्हणाले, येथे बगीचा, प्राथमिक शाळा, स्मशानभूमी यासाठी भूखंड आरक्षीत आहे. पुनर्वसनचे काम पुर्ण झाल्यावर, विक्री होणा-या इमारतीचे काम सुरू असताना सुविधा मिळाव्यात यासाठी बदल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.तसेच, एकत्रित झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमधील एकूण २०८६ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.इतर झोपडीधारकांचे पुनर्वसन दोन पुनर्वसन इमारतीमध्ये करण्यात येणार असून, त्यामध्ये १७०७ सदनिका प्रस्तावित आहे, अशी माहिती वायकर यांनी दिली.मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थाना शासकीय जमिनी अटी व शर्ती नुसार भाडेपट्ट्यावर दिल्या होत्या. मात्र, काही सभासद पात्र नसून त्यांच्याकडून दंड वसूल करून पात्र करण्याची मोहीम राबवून गृहनिर्माण संस्थांना दिलासा देण्यात येत असल्याची माहिती महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिली.यासंदर्भात सदस्य अतुल भातखळकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. उत्तरात राठोड म्हणाले की, संबंधित गृहनिर्माण संस्थांनी इमारत बांधकाम अधिमुल्य, सदनिका हस्तांतरणाचे अधिमूल्य, हस्तांतरणीय विकास हक्काचे अधिमूल्य, संस्थेच्या इमारतीमधील सदनिका तारण ठेवण्याचे शुल्क, भाडे पट्ट्याची रक्कम इत्यादीसाठी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेण्यात आली नसल्याने महसुलाचे नुकसान झाले आहे.या सोसायट्यांना व सदस्यांना दिलासा मिळावा यासाठी दंड आकारून पात्र करण्यात येत आहे. त्यासाठी दंड वसूल करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मंगेश कुडाळकर, सुनील शिंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
‘भीमनगरमध्ये ३४५ जणांना एसआरएचे घर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 4:42 AM