संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ३५ बिबटे
By admin | Published: March 14, 2017 04:29 AM2017-03-14T04:29:03+5:302017-03-14T04:29:03+5:30
बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या परिसरात बिबट्यांचा वावर वाढत असतानाच आता या उद्यानात तब्बल ३५ बिबट्यांची नोंद झाली आहे.
मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या परिसरात बिबट्यांचा वावर वाढत असतानाच आता या उद्यानात तब्बल ३५ बिबट्यांची नोंद झाली आहे. उद्यानात ठिकठिकाणी बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक कॅमेऱ्याद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ही माहिती समोर आली असून, बिबट्यांचा लगतच्या परिसरातील वावर कमी व्हावा यादृष्टीने पावले उचलण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून शनिवारी सकाळी ‘बिबट्या आणि मानवी संघर्ष’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही वर्षांपासून उद्यानालगतच्या रहिवासी क्षेत्रात
बिबट्याचा वावर वाढला आहे. मुख्यत: बिबट्या खाद्याच्या शोधात रहिवासी क्षेत्रात शिरकाव करत असून, ज्या ठिकाणी कोंबड्या पाळल्या जातात किंवा ज्या क्षेत्रात श्वान अधिक संख्येने आढळतात; तेथे बिबट्याचा वावर अधिक आहे.
मात्र बिबट्यांचा मानवी वस्तीमधील वावर कमी व्हावा आणि उद्यानाचे संरक्षण व्हावे म्हणून ठिकठिकाणी संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र संरक्षक भिंत बांधून हा प्रश्न सुटणार नाही, तर यासाठी अधिक पावले उचलण्याची गरज आहे; आणि ते काम सुरू
आहे. (प्रतिनिधी)