मुंबई : फटाक्यांमुळे मागील तीन दिवसात मुंबईत ठिकठिकाणी ३५ ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या आगीत मोठी जीवित किंवा वित्तहानी झाली नाही . फक्त एक व्यक्ति किरकोळ जखमी झाली. रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वात जास्त आगीच्या घटना घडल्या.
तीन दिवसांपासूनच अर्थात १० नोव्हेम्बरपासून मुंबईत आतषबाजीला सुरुवात झाली आहे. १० आणि ११ नोव्हेंबरला प्रत्येकी चार मिळून आठ घटनांची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली. पहिले दोन दिवस हे प्रमाण कमी होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले गेले. याच दिवशी रात्री दहा वाजल्याची वेळ टळून गेल्यावरही फटाके फोडले जात होते. या एका दिवसात तब्ब्ल २७ कॉल अग्निशमन दलाला आले. हे सर्व कॉल फटाक्यांमुळे लागलेल्या आगीबाबत होते. मात्र कोणत्याही ठिकाणी मोठी आग नव्हती. काही आगी या बेजबाबदारपणे फटाके फोडल्याने लागल्या, असेअग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
दिवाळीत फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे अग्निशमन दल या कालावधीत आणखी सतर्क होते. उद्या , मंगळवारी भाऊबीजेच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर फटाके फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्यावतीने आणखी खबरदारी घेतली जाणार आहे . मुंबई आणि महानगर प्रदेशात रात्री आठ ते दहा या वेळेतच फटके फोडण्याचे बंधन सर्वोच्च न्यायालयाने घातले आहे. मात्र वेळ संपून गेल्यानंतरही फटाके फोडले जात आहेत.