Join us

मुंबईत २४ तासांत पडझडीच्या ३५ घटना; अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 11:38 AM

हवामान खात्याने शुक्रवारीही शहरात पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या २४ तासांत शहर आणि उपनगरांतील विविध भागांत पडझडीच्या ३५ घटना घडल्या.

मुंबई : हवामान खात्याने शुक्रवारीही शहरात पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या २४ तासांत शहर आणि उपनगरांतील विविध भागांत पडझडीच्या ३५ घटना घडल्या. 

झाडांच्या फांद्या कोसळणे, शॉर्ट सर्किटमुळेही नुकसान झाले. पावसामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी घराच्या भिंतीही कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. वाहनांसह मालमत्तांचे नुकसान झाल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. नियंत्रण कक्षात किरकोळ अपघातांचे वर्दी देणारे फोन सतत घणघणत असल्याने अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी धाव घेण्यात गुंतले होते. 

  भारतीय हवामान खात्याने अति मुसळधार पावसाचा इशारा दिला होता.   ही बाब लक्षात घेता, महापालिकेच्या सर्व सहायक आयुक्तांनी दरडप्रवण क्षेत्रात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकासह तैनात ठेवावे.   आवश्यक ती प्रतिबंधात्मक पावले उचलावीत, असे निर्देश महापालिका आयुक्त यांनी यंत्रणेला दिले. 

घराचे सिलिंग कोसळून महिला जखमी

मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असतानाच मुलुंड पश्चिमच्या तांबेनगरमधील एका घरात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सिलिंगच्या प्लास्टरचा काही भाग कोसळला. यात एक महिला जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्या महिलेचे नाव श्वेता गंभिरे (३५) आहे. त्यांना उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.